Aurangabad Rename: औरंगाबाद जिल्ह्याचा नामांतराला विरोध करण्यासाठी एमआयएमकडून आज भव्य असा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. तर यावरून शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी एमआयएम नेत्यांवर निशाणा साधला आहे. एमआयएमच्या नेत्यांनी कबुल करावं की, औरंगजेब त्यांचा बाप होता, असा खोचक टोला दानवे यांनी लगावला आहे. तर एमआयएमला शिवसेना जशाच तसे उत्तर द्यायला तयार असल्याचं सुद्धा दानवे म्हणाले. 


यावेळी बोलतांना दानवे म्हणाले की, औरंगजेब आक्रमक होता, त्याने सत्तेसाठी आपल्या वडिलांना कैद केले होता. त्याने मंदिर लुटली लोकांचा छळ केला होता. मात्र एमआयएम संघटना नेहमी औरंगजेबच्या कबरीवर लोटांगण घालत असते. त्यामुळे त्यांनी हे तरी कबूल केलं पाहिजे की, औरंगजेब आमचा बाप होता, आजोबा होता किंवा पणजोबा होता. आम्ही तरी अभिमानाने म्हणतो की, बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर केले आहे, असं दानवे म्हणाले. 


जनमताचा कौल संभाजीनगरच्याच बाजूने


आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने एमआयएम मुस्लीम मतांची जुळवाजुळव करत आहे. त्यात बाकी काही लोकं आपल्या सोबत येत नसल्याने मुस्लीम लोकांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. शिवसेनेने औरंगाबाद की संभाजीनगर यावर निवडणुका लढवलेल्या आहेत, त्यात संभाजीनगरचा नेहमी विजय झाला आहे. त्यामुळे जनमताचा कौल संभाजीनगरच्याच बाजूने आहे. शिवसेना जशाच तसे उत्तर द्यायला तयार असून, एमआयएमला औरंगजेबाचा एवढा पुळका का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. 


Aurangabad Renamed : खडकी ते औरंगाबाद आणि आता संभाजीनगर, काय आहे या शहराच्या नावाचा इतिहास?


असा निघणार मोर्चा... 


औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी एमआयएमसह काही संघटनांनी मोर्च्याची हाक दिली होती. त्यानुसार काही वेळेत शहारतील भडकलगेट येथून आमखास मैदानाकडे हा मोर्चा निघणार आहे. या मोर्च्यात मोर्चेकरी तोंडावर काळी पट्टी बांधून निघणार आहेत. सोबतच हातात तिरंगी झेंडे असणार आहे.तर मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.