Aurangabad News: शिंदे-फडणवीस सरकार येऊन महिना उलटला असतांना देखील अजूनही पालकमंत्र्याची घोषणा झाली नाही. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात कुणाच्या हस्ते ध्वजारोहण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होतं. पण यावर शिंदे सरकारने तोडगा काढला असून, आठही जिल्ह्यात ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्याची यादी जाहीर केली आहे. ज्यात औरंगाबाद येथील ध्वजारोहण नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. 

यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण 

अ.क्र. जिल्हा  मंत्री 
1 औरंगाबाद  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 
2 नांदेड  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
3 हिंगोली  सुधीर मूनगंटीवार 
4 लातूर  गुलाबराव पाटील 
5 परभणी  अतुल सावे 
6 बीड   संदिपान भुमरे 
7 उस्मानाबाद  तानाजी सावंत 
8 जालना  अब्दुल सत्तार  

पालकमंत्रीपद कधी...

शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रीमंडळ विस्तार होऊन महिना उलटला आहे. मात्र असे असताना देखील राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावर नियुक्त्या अजूनही झाल्या नाहीत. त्यामुळे 15 ऑगस्टरोजी सरकारने आदेश काढत वेगवेगळ्या मंत्र्यांना जिल्ह्यातील ध्वजारोहण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने सुद्धा असेच आदेश काढण्यात आले आहे. त्यामुळे पालकमंत्रीपद कधी भरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सरकारला नाराजी नाट्याची भीती?

शिंदे-सरकारमध्ये आधी मंत्रिपदावरून नाराजीनाट्य पाहायला मिळाले होते. त्यातच आता पालकमंत्री पदासाठी सुद्धा एकाच जिल्ह्यात अनेक जणांनी दावे केली आहे. त्यामुळे पालकमंत्रीपद जाहीर झाल्यावर सरकारमध्ये पुन्हा एकदा नाराजीनाट्य पाहायला मिळण्याची भीती आहे. त्यामुळे अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सावध भूमिका घेतली जात असल्याचं बोलले जात आहे. 

महत्वाच्या बातम्या...