Aurangabad News: रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या मतदारसंघातील महत्वाकांक्षी ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचे कंत्राट भुमरे यांच्या जावाई यांना मिळाले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. ब्राम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचं कंत्राट ज्या कंत्राटदाराला मिळाले आहे, त्याच्याकडून भुमरे यांच्या जावाई यांनी रजिस्ट्री करून घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तर शिंदे सरकारमधील (Shinde government)  मंत्र्यांवर पहिलाच भष्ट्राचाराचा आरोप झाल्याने आता खळबळ उडाली आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठणच्या सभेत ज्या कामांची घोषणा केली आहे, त्यांची यापूर्वीचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेली आहे. त्या कामांना सुरवात देखील झाली आहे. तर भुमरे यांच्या मतदारसंघातील महत्वाकांक्षी ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिली होती. मात्र या योजनेचे कंत्राटदार कोण? तर ते भुमरे यांचे जावाई असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. 


दानवे यांची चौकशी ची मागणी...


ज्या कंत्राटदाराला काम मिळाले होते, त्याच्याकडून भुमरे यांच्या जावाई यांनी रीतसर खरेदीखत केलेलं आहे. प्रत्यक्षात मात्र अशाप्रकारे कंत्राटच खरेदीखत करता येत नसते. असे असतांना मंत्री भुमरे यांचे जावाई यांनी औरंगाबाद येथील रजिस्ट्री कार्यालयात संबधित कंत्राटदाराकडून कंत्राट रीतसर खरेदीखत करून घेतले आहे. हा खूप गंभीर प्रकार असून, याची चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे. 


राजकीय वातावरण तापणार... 


यावेळी पुढे बोलतांना दानवे म्हणाले, ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना जनतेच्या हितासाठी आहे की, भुमरे यांच्या जावाईसाठी आहे असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. दानवे यांनी केलेल्या आरोपावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शिंदे सरकार येऊन महिना उलटत नाही तो त्यांच्या मंत्र्यावर आता भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे. 


भुमरेंनी आरोप फेटाळले...


अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपांचा भुमरे यांनी खंडन केले आहे. असा काही प्रकार झाला असल्याचं दानवे यांनी दाखवून द्यावे, त्यामुळे हे आरोप चुकीचे आहेत. या कामाचे अजून टेंडर निघाले नाही, त्यामुळे आरोपात काहीही तथ्य नसल्याच भुमरे म्हणाले आहेत.