Ajit Pawar On Shinde-Fadnavis Government: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान याचवेळी त्यांनी राज्यातील पीक विम्याच्या मुद्यावरून देखील सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे. 'पीकविमा न देणारं सरकार शेंगदाणे-फुटाणे खातयं का? असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. औरंगाबादच्या (Aurangabad) वैजापूर येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, शेतमालापेक्षा खताचे दर वाढल्याने काहीच परवडत नाही. मागे यांनीच सांगितले होते की, शेतकऱ्यांना जो काही खर्च येईल त्याच्या दीडपट त्यांच्या हातात देऊ. पण कुठे आहेत दीडपट भाव, आजही या सरकारच्या काळात तीन ते चार शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यामुळे सरकार कमी पडत असून, याला जबाबदार कोण आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले, मात्र त्याचं पीकविमा अजूनही जमा झाला नाही. त्यामुळे हे सरकार काय करत आहे, फुटाणे खातयं का? शेंगदाणे खात आहे, असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, हे सरकार आलं आणि शेतमालाचे भाव पडले, त्यामुळे यांचा पायगुण बघा. सरकारमध्ये आल्यावर या लोकांनी सांगितले की, आम्ही दिवसा लाईट देऊ, पण कुठं दिवसा लाईट देत आहे. आणखी यांच्याकडून आहे ती लाईट तोडण्यात येत आहे. राज्यात रोज तीन-चार शेतकरी आत्महत्या करत असून, हे सरकारचा नाकर्तेपणा नाही का? याला जबाबदार कोण? असा सवाल देखील पवारांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपची महत्वाची भूमिका
सरकारविरोधात लोकांमध्ये असलेली मोठ्या प्रमाणात चीड दिसत आहे. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. तुम्ही रात्री 12 ला जरी सांगितले तरी, आम्ही तुमच्या मागे उभे राहणारे आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर निवडून आलेल्यांनी त्यांच्याच मुलाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचल. तर महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपने देखील महत्वाची भूमिका बजावली आहे. राज्यातील सध्याच्या राजकर्त्यांनी महापुरुषांच्या विचारांना तिलांजली दिली असल्याच देखील अजित पवार म्हणाले.
बंडखोर आमदारांना सुरक्षा कशासाठी...
सरकारमधील 40 आमादारंना कशाला सुरक्षा पाहिजे?, एका आमदाराला महिनाभर वाय प्लस सुरक्षा द्यायला 20 लाख रुपये खर्च येतो. मात्र पत्रकारांवर हल्ले होतात, आदित्य ठाकरे आणि प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ले होतात तेव्हा तुम्ही काय करत होता. कायदा सर्वांना समान आहे. सरकारमधील आमदार कोणालाही मारतात, काही तर भाषणात सांगतात चुन चुन के मारुंगा ही कोणती पद्धत आहे, असेही पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: