Aurangabad Politics: आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) राजकीय आरोप-प्रत्यारोप मोठ्याप्रमाणावर वाढले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या दारूच्या दुकानासमोर टाकण्यात आलेल्या ब्रेकरची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी विकासकामे करण्यापेक्षा दारूची दुकाने थाटली असून, आता त्यासमोर ग्राहकांनी थांबावे म्हणून गतीरोधक बसवले असल्याची टीका विरोधकांकडून अप्रत्यक्षरित्या केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी तर आज विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या स्पीड ब्रेकरवरून भुमरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 


काही दिवसांपूर्वी पैठण दौऱ्यावर आलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जाहीर सभेतून संदिपान भुमरे यांच्यावर टीका करताना, भुमरे यांनी मतदारसंघात विकासकामे करण्यापेक्षा दारूच्या दुकाने थाटण्याचे कामं केल्याचं आरोप केला होता. त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी पैठणच्य बिडकीन सभेत बोलताना आदित्य यांनी देखील याच मुद्यावरून भुमरे यांच्यावर टीका केली होती. त्यातच आता अजित पवार यांनी देखील दारूची दुकाने आणि त्यासमोर टाकलेल्या स्पीड ब्रेकरचा मुद्दा उपस्थित करून भुमरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 


काय म्हणाले अजित पवार! 


पैठण येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, औरंगाबादचे पालकमंत्री भुमरे यांनी पैठणला काय दिले आहे. मंत्रिपद, पालकमंत्री मिळाले आणि दारूची नऊ दुकाने आणली. आता हे खरं आहे की, खोटं तुम्हालाच माहित आहे. तसेच या दारूच्या दुकानासोमर स्पीड ब्रेकर लावला. काय तर म्हणे गाडी थांबावी, थांबून गिऱ्हाईकने यावं, टाकावं अन् जावं, अशी खोचक टीका अजित पवार यांनी भुमरे यांच्यावर केली आहे. 


आदित्य ठाकरेंची देखील स्पीड ब्रेकरवरून टीका 


दरम्यान दोन दिवसांपूर्वी बिडकीन येथील सभेतून आदित्य ठाकरे यांनी देखील भुमरे यांच्यावर अशीच काही टीका केली होती. 'मी ऐकलं आहे की, भुमरे औरंगाबादचे पालकमंत्री झाल्यावर त्यांनी पहिले काम म्हणजे, बरेच स्पीड ब्रेकर (दारूच्या दुकानाजवळ) लावले आहे. म्हणजे गाडी हळू झाली की, दुकान दिसेल. दुकान दिसले, तर किती आहेत (दुकानं)...मी ऐकलं बारा आहेत. मोजून बघा एकदा, माहिती काढा असे आदित्य ठाकरे म्हणाले होते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aaditya Thackeray:  'भुमरेंची किती आहेत? मी ऐकलं बारा आहेत...', आदित्य ठाकरे म्हणाले