Aurangabad News: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा सकाळी 11 वाजता राजभवन या ठिकाणी शपथविधी होणार आहे.  यावेळी एकूण 18 मंत्री शपथ घेणार आहेत. ज्यात शिंदे गटाचे (Eknath Shinde) 7 मंत्री तर भाजपकडून (BJP) 11 जणांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. पण शिंदे गटाच्या सात जणांच्या यादीत अब्दुल सत्तार यांचे नाव असणार की नाही याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार मुंबईत तळ ठोकून बसले असून, आपली मंत्रीपदी वर्णी लागावी म्हणून प्रयत्न करतायत. 


मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या एक दिवस आधी सत्तार यांच्या मुलांचे टीईटी घोटाळ्यात नाव आल्याने, शिंदे आणि फडणवीस यांनी सावध भूमिका घेतली आहे. शिंदे गटाकडून अब्दुल सत्तार यांचे नाव आघाडीवर होते. तर त्यांच्याकडे अल्पसंख्याक मंत्री पदाची जवाबदारी सुद्धा देण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र मंत्रिपदाची शपथविधी आधीच भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने सत्तार यांचा पत्ता कट झाला असल्याची चर्चा आहे. तर सूत्रांच्या आधारे आलेल्या यादीत सुद्धा सत्तार यांचे नाव नसल्याचे पाहायला मिळत आहे. 


सत्तार मुंबईत ठाण मांडून...


अब्दुल सत्तार यांच्या मुलांवर टीईटी घोटाळ्याचे आरोप होताच, आपले नाव मंत्रिमंडळातून डावलण्याची शक्यता असल्याचा अंदाज सत्तार यांना आला होता. त्यामुळे सत्तार कालपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. फक्त एकनाथ शिंदेच नाही तर भाजपमधील आपल्या जुन्या मित्रांच्या मदतीने सुद्धा त्यांच्याकडून प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सत्तार यांना मंत्रीपद मिळणार की संधी हुकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


सत्तार यांचा राजकीय प्रवास


2009 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले.
2014 महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले.
2019 महाराष्ट्र विधानसभेसाठी तिसऱ्यांदा पुन्हा निवडून आले.
2019 मध्ये ठाकरे सरकारमध्ये महसूल, ग्रामीण विकास, बंदरे, खार जमीन विकास आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री म्हणून नियुक्ती
2020 मध्ये धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती. 
2022 मध्ये उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सहभाग.