Aurangabad News: मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक अक्षरशः वाहून गेली आहे. तर उरलेल्या पीकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धरपड सुरु आहे. दरम्यान शेतातील पीकांना पाण्याची गरज असल्याने मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या एका वीस वर्षीय तरूणांचा विजेचा शॉक (Electric Shock) लागल्याने जागीच मृत्यू झाला असल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील थेरगाव शिवारतील ही घटना आहे. गणेश भाऊसाहेब जाधव (वय 20 वर्षे) असे मयत तरुणाचे नाव आहे. 


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास गणेश आपल्या थेरगाव शिवारात असलेल्या शेतात पीकांना पाणी भरण्यासाठी गेला होता. तर पाणी देण्यासाठी तो नेहमीप्रमाणे शेतातील विद्युत मोटार चालू करण्यासाठी त्याने बटन दाबले. मात्र अचानक यावेळी मोटारच्या बटनात विद्युत प्रवाह उतरल्याने गणेशला जोराचा शॉक लागला आणि तो जमिनीवर कोसळला. दरम्यान शेतात गेलेल्या नातेवाईकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी त्याला पाचोड येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डाँ.नोमान शेख यांनी गणेशला तपासून मृत घोषीत केले. तसेच उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 


नातेवाईकांची रुग्णालयात धाव.. 


शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या गणेशाला विजेचा शॉक लागल्याची माहिती काही वेळातच गावात वाऱ्या सारखी पसरली. या घटनेची वार्ता कळताच गावातील नातेवाईकांसह मिञ मंडळींनी पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर डॉक्टरांनी गणेशला मृत्यू घोषित करताच अनेकांना अश्रू अनावर झाले. 


गावात हळहळ...


गणेश भाऊसाहेब जाधव होतकरू तरुण होता. त्याच्या कामाची गावात नेहमीच चर्चा व्हायची. तसेच शेतात कुटुंबाच्या मदतीला तो नेहमी धावून यायचा. तसेच शेतातील अनेक कामे देखील गणेश सांभाळून घ्यायचा. त्यामुळे त्याचे नेहमीच अनेकजण कौतुक देखील करायचे. मात्र त्याचा असा अपघाती निधानाची बातमी आल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तर गणेशच्या जाण्याने जाधव कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


पोलिसात नोंद...


थेरगाव परिसरात तरुणाला विजेचा शॉक लागल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेऊन माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थित उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकंच्या ताब्यात देण्यात आला. तसेच या सर्व घटनेची नोंद पाचोड पोलिसात करण्यात आली आहे. तर पुढील तपास देखील पोलीस करतायत. 


नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकांची मागणी करणार; कृषिमंत्री अब्दूल सत्तारांची माहिती