Aurangabad News: परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे मोठ्याप्रमाणावर आवक घटल्याने भाजीपाल्यांचे दर चांगलेच वधारले आहे. दरम्यान भाजी बाजारात शेवगा 200 रुपये किलो मिळत आहे. तसेच शहरातील किरकोळ भाजी बाजारात वांगी, टोमॅटो, भेंडी, फ्लॉवरसह सर्वच फळभाज्यांची सरासरी 60 रुपये किलो दर पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. 

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पीकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसला आहे. या सर्व परिस्थितीत भाजी बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर देखील वाढले आहेत. शहरातील जाधववाडी बाजार समितीतच फळभाज्यांचे भाव सरासरी 30  ते 50  रुपयांवर पोहचले आहे. त्यामुळे केळीबाजार, औरंगपुरासह शहरातील किरकोळ भाजीमंडईत भेंडी, वांगी, दोडका, फ्लॉवर, टोमॅटो 60 रुपयांपर्यंत वधारले आहे. तर मेथी, कोथिंबीर, पालकची एक जुडी 15 रुपयांपर्यंत वधारली आहे. तर शेवगासह इतर शेंगा देखील भाव खात आहे. 

भाजीपाला दर 

अ.क्र. भाजीपाला  दर (प्रतिकिलो)
1 शेवगा  200
2 गवार  80
3 टोमॅटो 60
4 भेंडी  60
5 वांगी  60
6 फ्लॉवर 60
7 कांदा  50
8 बटाटे  30
9 मेथी  15
10 कोथिंबीर  15
11 पालक  15

शेतकऱ्यांना मोठा फटका...

एकीकडे भाजीपाला दराचा फटका सर्वसामान्य बसत असला तरीही, दुसरीकडे शेतकऱ्यांना देखील अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे. कारण यंदा देखील औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर भाजीपाल्याची लागवड केली होती. मात्र अतिवृष्टीमुळे त्यांचेही नुकसान झाले आहे. गंगापूर तालुक्यातील गवळीशिवार परिसरात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्यांची आवक देखील घटली आहे.