Aurangabad Crime News: शेजारच्या सोबत सुरू असलेल्या वादात स्वतःचा नवराच आपली साथ देत नसल्याने आणि बेदम मारहाण करत असल्याने औरंगाबादच्या सविता दीपक काळे नावाच्या महिलेने थेट पोलीस आयुक्त कार्यालयातच स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर आता याप्रकरणी औरंगाबादच्या वाळूज पोलीस ठाण्यात महिलेच्या पतीसह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यात पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे.
मृत महिला सविता यांचा पती दीपक काळे चालक असून त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा सविता यांना संशय होता. यातून ती महिला, तिचा पती आणि मुलगा सविता यांच्यासोबत नेहमी भांडत होते. विशेष म्हणजे यात त्यांना सविता यांचा पती साथ देत होता. अनेकदा दीपक काळे हा आपल्या पत्नीला मारहाण सुद्धा करायचा. त्यामुळे याबाबत वाळूज पोलीस ठाण्यात सविता यांनी गुन्हा सुद्धा दाखल केला होता. मात्र पोलीस दुर्लक्ष करता असल्याची सविताचा तक्रार होती. त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत थेट पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाच्या पायऱ्यावर जाऊन स्वतःला पेटवून घेतले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
यांच्यावर गुन्हा दाखल...
याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात पाच लोकांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात मयत महिलेचा पती दीपक मनोहर काळे ( वय 42 वर्ष, धंदा: ड्राइवर, र.मांडवा तालुका-गंगापूर,जिल्हा औरंगाबाद), शेजारी असलेले, अशोक तुकाराम शेळके (वय45 वर्ष, धंदा-शेती), गोकुळ अशोक शेळके (वय- 20 वर्ष, धंदा- शिक्षण, सर्व राहणार: मांडवा तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद) यांच्यासह अशोक शेळके यांच्या पत्नी आणि वाळूज पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तर यापैकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
विशेष म्हणजे सविता यांना मारहाण करतानाचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. सविता यांच्या भावाने हा व्हिडिओ पोलिसांना दिला आहे. ज्यात सविता यांना खाली पाडून तीन-चार लोकं बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. तर सततच्या मारहाणीला आणि छळाला कंटाळून सविता यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या लोकांनी केला आहे.
पोलीस कर्मचाऱ्यावरही गुन्हा दाखल...
शेजाऱ्यांसोबत सुरु असलेल्या वादाबाबत सविता यांनी अनकेदा वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले. मात्र असे असतांना पोलिसांकडून याची गंभीर दखल घेण्यात आली नाही. अनेकदा मागणी करूनही सविता यांच्या तक्रारीकडे पोलिसांनी दुलर्क्ष केल्याचा आरोप सुद्धा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.