Aurangabad News: औरंगाबादच्या लासूर स्टेशन येथील कांदा मार्केटमध्ये शेतकरी आणि व्यापारी यांच्यात गोंधळ झाला असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून व्यापारी जाणीवपूर्वक लिलाव करत नसून शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचा आरोप करत शेतकरी आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. तर व्यापारांच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून, रास्त रोको करण्यात आला आहे. 


गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन हे कांदा विक्रीचे जिल्ह्यातील महत्वाचा मार्केट समजला जातो. याठिकाणी परिसरातील आणि जिल्हाभरातून कांदा उत्पादक शेतकरी कांदे विक्रीसाठी घेऊन येत असतात. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून व्यापारी कांदा लिलाव करत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तर थोडाफार कांदा घेऊन लिलाव बंद पाडला जात होता. त्यातच आज दुपारी बारा वाजेपर्यंत सुद्धा लिलावाला सुरवात झाली नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 


लासूर स्टेशन येथील कांदा मार्केटमध्ये लिलाव होत नसल्याने शेतकऱ्यांकडून मुंबई-नागपूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या अचानक रास्ता रोकोमुळे या महामार्गावरील एस क्लबजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याचे चित्र आहे. कांदा मार्केटमधील व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. 


घटनास्थळी पोलीस दाखल...


कांदा मार्केटमध्ये शेतकरी आणि व्यापारी यांच्यात झालेल्या गोंधळाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तर रास्ता रोको करणाऱ्या शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे. मात्र शेतकरी मोठ्याप्रमाणावर आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळत आहे.