Aurangabad News: लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक तरुणांना मुलीच मिळत नसल्याने मुंडवळ्या बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्हाला बायको मिळवून द्या, अशी मागणी करत काही दिवसांपूर्वी सोलापुरात मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे ग्रामीण भागात सद्या शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही हा सामाजिक प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान आता अशाच एका लग्नाळू तरुणाने मुलगी मिळत नसल्याने चक्क आमदारालाच फोन लावून, तुमच्या मतदारसंघात मुली पाहा अशी गळ घातली. दरम्यान आमदार आणि या तरुणाच्या संभाषणाची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. 


दरम्यान त्याचे झालं असे की, औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत (Udaysingh Rajput) यांना खुल्ताबाद तालुक्यातील एका तरूणाने फोन केला. घरी सर्व काही चांगलं आहे, आठ एकर शेती देखील आहे. पण तरीही लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचं दुखः व्यक्त केलं. तर हा तरुण एवढ्यावरच थांबला नाही, तुमच्या सर्कलमध्ये मुली असतील तर पहा ना अशी मागणी केली. यावर राजपूत यांनी देखील तरुणाला नाराज न करता, बायोडाटा पाठवून द्या, बघतो म्हणत आश्वासन दिले. सद्या या संभाषणाची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 


काय आहे संभाषणात! 


तरुण: हॅलो, साहेब जय महाराष्ट्र 


आमदार राजपूत: जय महाराष्ट्र


तरुण: रत्नपूरमधून बोलतोय साहेब, विजय होळकर... ग्रामीण मधून 


आमदार राजपूत: बोला, बोला, भाऊ, बोला 


तरुण: काय निवांत होते का? साहेब 


आमदार राजपूत: नाही. थोडंसं बसलेलो आहे...बोला बोला 


तरुण: साहेब असा विषय होता, घरी चांगलं आहे आपल्या, एवढी काही वाईट परिस्थिती नाही, आठ-नऊ एकर जमीन आहे. 


आमदार राजपूत: हा..हा..हा 


तरुण: पण साहेब इकडे कोणी मुलगी द्यायला तयारच नाही साहेब 


आमदार राजपूत: कुठे..कुठे 


तरुण: आपला रत्नापूर...म्हणजेच खुलताबाद भद्रा मारुती...


आमदार राजपूत: तुमचा बायोडेटा पाठवून द्या


तरुण: बायोडेटा म्हणजे... आपण रत्नापूरपासून खाली फुलंब्री रोडवरून खाली 6 किलोमीटर गाव आहे.


आमदार राजपूत: बायोडेटा, बायोडेटा पाठवून द्या 


तरुण: परिस्थिती चांगली आहे साहेब, पण...


आमदार राजपूत: बायोडेटा पाठवून द्या


तरुण: विकास भाऊच्या याच्यावर पाठवू का? 


आमदार राजपूत: हा..पाठवून द्या..पाठवून द्या 


तरुण: विकास भाऊचा नंबर आहे माझ्याकडे, तुमचा व्हाट्सअप नंबर हाच आहे का? 


आमदार राजपूत: हा..पाठवून द्या पाठवून द्या..


तरुण: तुमच्या कन्नड सर्कलमध्ये देखील भरपूर मुली आहेत साहेब..


आमदार राजपूत: बरं..बरं बोलतो....