Grishneshwar Temple : औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District)  श्री क्षेत्र घृष्णेश्वर (Grishneshwar Temple) वेरुळ विकास आराखड्यातील वेरुळ येथील लेणी क्रमांक 1 ते महादेव मंदिर पर्यंतच्या 4  लेन बीटी वळण रस्त्याला अखेर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारी समितीने मान्यता दिली. आज मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची दूरदृश्य प्रणालीव्दारे (VC) बैठक पार पडली. या बैठकीस विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, नियेाजन अधिकारी वायाळ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी वळण रस्ता करण्याची आवश्यकता उच्चाधिकार समितीला सांगितली. यावेळी ते म्हणाले वेरुळ येथे जगप्रसिध्द लेणी व ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे जगातील विविध देशातून पर्यटक व भाविक वेरुळ येथे भेट देतात. ही लेणी औरंगाबाद ते धुळे या राष्ट्रीय महागार्मावर असल्यामुळे नेहमी वाहतूक असते. त्यामुळे वाहनापासून होणाऱ्या प्रदुषणाचा लेणीवर परिणाम होत आहे. प्रस्तावित वळण रस्ता मंजूर झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व वाहतूक या रस्त्यावर वळविण्यात येईल जेणेकरुन पर्यटकास वाहतुकीचा कोणताही त्रास होणार नाही. मागील महिन्यात वेरुळ येथील दुकानदारांशी संवाद साधला असता लेणी परिसरातील दुकानदार एमटीडीसीच्या व्हीजीटर सेंटरमध्ये स्थलांतरीत होण्यास तयार असल्याचेही पाण्डेय यांनी समितीला सांगितले.


यावेळी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर म्हणाले की, बाह्य वळण रस्त्यामुळे लेणी व मंदिर परीसर प्रदूषण मुक्त होईल. भविष्यात वाढणाऱ्या  वाहनांची संख्या, पर्यटक, भाविकांची संख्या लक्षात घेता हा  वळण रस्ता होणे आवश्यक आहे. या वळण रस्त्यांसाठी (BYPASS) 27 कोटी 58 लाख रुपयांचा निधी लागणार असून वळण रस्यात उच्चाधिकार समितीने मान्यता द्यावी असेही ते म्हणाले. दरम्यान जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या मागणीनंतर श्री क्षेत्र घृष्णेश्वर वेरुळ विकास आराखड्यातील वेरुळ येथील लेणी क्रमांक 1 ते महादेव मंदिर पर्यंतच्या 4 लेन बीटी वळण रस्त्याला उच्चाधिकारी समितीने मान्यता दिली. त्यामुळे वेरूळ लेणीच्या परिसरात होणारी वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. 


वाहतूक कोंडी सुटणार! 


औरंगाबादच्या वेरूळ लेणीचा मुख्य प्रवेशद्वार औरंगाबाद ते धुळे या राष्ट्रीय महागार्मावर आहे. त्यामुळे या महामार्गावरून नेहमी वाहनांची गर्दी असते. त्यात पर्यटकांची गर्दी पाहता याठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होती. याचा फटका पर्यटकांसोबतच या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना देखील होतो. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वेरुळ येथील लेणी क्रमांक 1 ते महादेव मंदिर पर्यंतच्या 4  लेन बीटी वळण रस्त्याची मागणी होत होती. मात्र यासाठी उच्चाधिकारी समितीची परवानगी आवश्यक होती. पण अखेर आता या वळण रस्त्यासाठी परवनागी मिळाली असल्याने वेरूळ येथील वाहतूक कोंडी सुटणार आहे.