Aurangabad News: पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या 25  वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज दुपारी औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील नारायणगावात घडली आहे. बाळू रामनाथ गवळी (वय 25 वर्षे, रा. नारायणगाव, ता,पैठण) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर बाळूच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


शेतात राबराब राबणाऱ्या सज्यराजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. दरवर्षी मोठ्या उत्साहात पोळा हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो. यंदा 26 तारखेला पोळा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वच शेतकरी आज आपल्या बैलाला अंघोळ घालतात. दरम्यान नारायणगाव येथील बाळू गवळी हा तरुण दुपारी बारा वाजेच्या सुमारास गावातील नदीमध्ये जनावरे धुण्यासाठी घेऊन गेला होता. मात्र पाण्यात उतरलेल्या बाळूला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. 


उद्या बैल पोळा असल्याने जनावरे धुण्यासाठी जात असल्याचं सांगून बाळू घरून निघाला होता. मात्र बराच वेळ झाल्याने बाळू घरी आला नसल्याने त्याला घरच्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी व मित्रांनी त्याचा शोध घायला सुरवात केली. दरम्यान त्याचा शोध घेत असतानाच तो नदीच्या पाण्यात आढळून आला. त्यामुळे त्याला तात्काळ बाहेर काढून पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. 


गावात शोककळा....


नारायणगाव गावात बहुतांश गावकरी शेतीच करतात. त्यामुळे उद्याचा पोळा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची गावभर तयारी सुरु होती. गवळी कुटुंबातील सदस्यांकडून सुद्धा दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र गावातील तरुण बाळूचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची बातमी गावात माहीत होताच गावात शोककळा पसरली. तर या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 


नदीत उतरतांना काळजी घ्यावी...


बैल पोळा सणाच्या पूर्वसंध्येला आणि उद्या शेतकरी आपल्या बैलाला अंघोळ घालतात. ग्रामीण भागात सहसा नदी किंवा नाल्यात असलेल्या पाण्यात बैलांना अंघोळ घातली जाते. मात्र यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने नदी-नाले तुडंब भरलेले असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही.  त्यामुळे बैलांना अंघोळीसाठी घेऊन जातांना शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. तसेच लहान मुलांना नदीत उतरवू देऊ नयेत. 


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: औरंगाबाद- उस्मानाबाद नामांतराच्या प्रस्तावाला विधानसभेत मंजुरी, मुख्यमंत्र्यांची घोषणा


Ganeshotsav 2022 : गौरी गणपतीसाठी कोकणात औरंगाबाद विभागातून 165 बस जाणार