Aurangabad News : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं (Farmer Suicide In Marathwada) भीषण वास्तव समोर आलं आहे. कारण 1 जानेवारी ते 25 ऑगस्ट या 237 दिवसांत मराठवाड्यातील एकुण 626 शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवलं आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्या सर्वाधिक शेतकऱ्यांची संख्या बीड जिल्ह्यातील आहे. एकट्या बीड जिल्ह्यात 237 दिवसांत 170 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 

पाच मंत्री असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात 109 शेतकऱ्यांची आत्महत्या...

बीड जिल्ह्यानंतर सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या जिल्ह्यात औरंगाबादचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 237 दिवसांत 109 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे याच औरंगाबाद जिल्ह्यात पाच मंत्री आहेत. ज्यात केंद्राचे अर्थ राज्यमंत्री, रेल्वे राज्यमंत्री आणि राज्याचे कृषी, सहकार, रोजगार व फलोत्पादन मंत्री यांचा समावेश आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्याप्रमाणात मंत्री असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येची संख्या आता यापुढे तरी कमी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

शेतकरी आत्महत्या आकडेवारी ( 1 जानेवारी ते 25 ऑगस्ट)

     
अ.क्र. जिल्हा  आत्महत्या आकडेवारी 
1 औरंगाबाद  109
2 जालना  77
3 परभणी  50
4 हिंगोली  24
5 नांदेड  89
6 बीड  170
7 लातूर  36
8 उस्मानाबाद  71
एकूण     626

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे लक्ष...

जुलै महिन्यानंतर ऑगस्टमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. तसेच लवकरच नुकसान भरपाई मिळण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र त्यानंतर पुन्हा अतिवृष्टी झाल्याने नुकसानग्रस्त भागाची संख्या वाढली आहे. तसेच नुकसानभरपाई सुद्धा अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. त्यामुळे 12 सप्टेंबरला औरंगाबाद दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करणार याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या... 

Jayakwadi Dam: यावर्षी पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले; नदीकाठावर अलर्ट

Aurangabad : मुख्यमंत्र्यांचा 12 सप्टेंबरला औरंगाबाद दौरा, भुमरेंच्या मतदारसंघात जाहीर सभा