Maharashtra Rain Flood Update: सध्या राज्यात परतीच्या पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. या पावसामुळं (Maharashtra Monsoon) अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे. सरकारकडून नुकसान भरपाई म्हणून मदत देखील दिली जाणार आहे. मात्र निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचं काय होणार असा सवाल होता. अशा निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत केली जाणार आहे. याबाबत शासन निर्णय GR निघाला आहे. याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात शासन निर्णय काढून जिल्ह्यांना निधी वितरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आज मदत व पुनर्वसन विभागाने 755 कोटी रुपयांच्या निधीचे औरंगाबाद, अमरावती आणि पुणे विभागातील नऊ जिल्ह्यांना वितरण करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या व निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने यातून दिलासा दिला आहे.
30 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्याचा निर्णय घेतला होता. जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने यातून मोठा दिलासा मिळाला आहे. एसडीआरएफच्या निकषापलीकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा भरीव लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
शेतीचं नुकसान झाल्यानंतर अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये बसत नसतानाही झालेल्या नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद, अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते. त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला होता. आता याचा शासन निर्णय देखील निघाला आहे. त्यामुळं या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे.
20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान किरकोळ पावसाची शक्यता
दिवाळ सणादरम्यान साधारण 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान राज्यात किरकोळ पावसाची शक्यता आहे. रब्बी हंगामाच्या शेवटच्या आवर्तनातील किरकोळ पाऊस पडणार आहे. मात्र, उद्यापासून राज्यात मान्सून माघारी फिरण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे. त्यामुळं राज्यात पावसाची उघडीप होणार असल्याचं तज्ञांनी सांगितलं आहे. मुंबईसह ठाणे परिसरात देखील पावसानं चांगलीच हजेरी लावली. त्याचबरोबर बीड, कोल्हापूर, धुळे, पालघर, लातूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. आजही हवामान विभागानं राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
ही बातमी देखील वाचा