Aurangabad News: मुंबईत होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात गर्दी जमवण्याची चढाओढ सुरु असतानाच शिंदे गटाचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुंबईसाठी 300 बसेस बुक करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाला ( ST Mahamandal) पत्र पाठवले आहे. सोयगाव आणि सिल्लोड मतदारसंघातून या बसेस हव्या असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. 


दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्क मैदान शिवसेनेला देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीवर होणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. तर शिवसेनेच्या मेळाव्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला अधिक गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाचे सर्वच मंत्री कामाला लागले. दरम्यान औरंगाबादच्या सोयगाव-सिल्लोड मतदारसंघातून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला जाणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी अब्दुल सत्तार यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे 300 एसटी बसेसची (ST Bus) मागणी केली आहे. यासाठी त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या सिल्लोड-सोयगावच्या आगार प्रमुखांना पत्र सुद्धा पाठवले आहे. 


काय म्हटलं आहे पत्रात... 


दिनांक 05 ऑक्टोबर 2022 रोजी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे आयोजित दसरा मेळाव्यासाठी सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघातून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक जाणार असून, यासाठी आपल्या महामंडळाकडून 300 नवीन, सुसज्ज व चांगल्या अवस्थेतील बसेसची आवश्यकता आहे. यासाठी असणारी रीतसर प्रक्रिया करण्यास आम्ही तयार आहोत. तरी आपल्या महामंडळाकडून 300 नवीन, सुसज्ज व चांगल्या अवस्थेतील बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात.




कोणत्या जिल्ह्यातून किती बसेस...


शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्यासाठी राज्यभरातून जोरदार तयारी करण्यात येत असून, बसेस बुक करण्यात आल्या आहे. ज्यात उस्मानाबाद 60 बसेस, नाशिक 400 बसेस, अकोला 20 ट्रॅव्हल्स बसेस, नागपूर 10 बसेस, रत्नागिरी 100 बसेस, सिंधुदुर्ग 500 ते 1000 कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित राहणार, वर्धा 500 ते 1000 शिवसैनिक मेळाव्याला उपस्थित राहणार, औरंगाबाद (सिल्लोड-सोयगाव) 300 बसेस उपलब्ध राहणार आहेत. 


बैठकांवर बैठका...


शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. औरंगाबादच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आणि शहरातील वार्डात बैठका घेतल्या जात आहे. तसेच मेळाव्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांकडून जोरदार नियोजन करण्यात येत आहे. दरवर्षी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यासाठी औरंगाबाद येथून हजारो कार्यकर्ते जात असतात. त्यामुळे आता हे कार्यकर्ते आपल्याच मेळाव्याला उपस्थित राहावे यासाठी दोन्ही गटाकडून चढाओढ पाहायला मिळणार आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Sandipan Bhumre: 'फक्त मैदानात या दाखवतो', पालकमंत्री होताच भुमरेंचा खैरे-दानवेंवर हल्लाबोल


Maratha Reservation: अन्यथा परिणाम गंभीर होतील, तानाजी सावंतांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विनोद पाटलांचा इशारा