Babanrao Lonikar: गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल भाजप नेत्यांकडून सतत वादग्रस्त विधान केली जात आहे. त्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून, विरोधकांकडून देखील टीका केली जात आहे. दरम्यान भाजप नेत्यांच्या वादग्रस्त विधानावरून खुद्द भाजपचे आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी पक्षातील नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांच्या 100 पिढ्या बरबाद होतील असे लोणीकर म्हणाले. तर शिवरायांबद्दल असे विधान करणाऱ्यांचा पापाचा घडा भरल्यास अंत होईल असा खोचक टोलाही लोणीकर यांनी लगावला आहे. 


राज्यात शिवरायांबद्दल करण्यात येत असलेल्या वादग्रस्त विधानावर बोलतांना लोणीकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्र किंवा भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी आदर्श राजे होते आहेत आणि राहतील. त्यामुळे सर्वपक्षीय राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना भान ठेवणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या लोकांच्या शंभर पिढ्या बरबाद होतील, परंतु शिवरायांचा आदर्श मिटणार किंवा संपणार नाही असे भाजप आमदार बबनराव लोणीकर म्हणाले आहे. 


मागील अनेक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलणे किंवा अपशब्द वापरला जात आहे. ही बाब सर्वच राजकीय पक्षांसाठी चिंताजनक आणि लाजिरवाणी आहे. तर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल बोलताना तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा केवळ राजकारणाचा विषय नसून, जनतेच्या कल्याणासाठी लोकोपयोगी राज्य कारभार कसा चालवावा याचा आदर्श प्रत्येक राजकीय व्यक्तीने आपल्या डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे असेही लोणीकर म्हणाले.


अन्यथा अंत होईल...


महाभारतामध्ये शिशुपालाच्या शंभर अपराधानंतर त्याचा देखील अंत झाला होता. असा दाखला देत लोणीकर यांनी सर्व पक्षीय राजकारन्यांना खडे बोल सुनावले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना माहिती घेऊन अभ्यास करून आणि आदरयुक्तच बोललं पाहिजे असेही लोणीकर यांनी सर्वपक्षीय राजकारण्यांना ठणकावले आहे. 


शिवाजी महाराजांसारखा राजा पुन्हा होणे नाही...


तर छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आहेत की ज्यांना रयतेचे राजे असे म्हटले जाते, त्यामुळे शिवाजी महाराजांसारखा रयतेचा राजा पुन्हा होणे नाही. ही बाब राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विसरून चालणार नाही. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी काम केले त्याच  तोलामोलाचे काम करणे जरी शक्य नसले तरी त्या पद्धतीने आपल्याला सर्वसामान्य जनतेसाठी काही करता येऊ शकते काय? यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असेही यावेळी लोणीकर म्हणाले.