Aurangabad Municipal Elections: राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार औरंगाबाद महापालिका प्रशासनाने आगामी निवडणुकीसाठीच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आणि अधिसूचना आज जाहीर केल्या आहे. औरंगाबाद महापालिकेचे उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे यांनी हा प्रारूप आराखडा जाहीर केला. शहरातील सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना आणि प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर केल्यानंतर महापालिकेच्या गेटवर लावण्यात आला आहे. तर महापालिकेने जारी केलेल्या प्रभाग रचना नमुन्यावर शहरवासीयांना 16 जूनपर्यंत हरकती व सूचना महापालिका प्रशासनाच्या निवडणूक विभागाकडे मांडता येणार आहेत. त्यांनतर नागरिकांनी सादर केलेल्या हरकती व माहितीचे निवेदन 17 जून रोजी राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त तथा निवडणूक विभाग प्रमुख डॉ.संतोष टेंगले यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले अधिकारी हे आलेल्या हरकती आणि सूचनांवर 24 जूनपर्यंत सुनावणी घेणार आहे. सुनावणीनंतर 30 जून रोजी नियुक्त केलेले प्रतिनिधी केलेल्या शिफारशी विहित नमुन्यात नमूद करून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करतील. तसेच प्रभाग रचनेचा नकाशा, मनपाच्या मुख्य कार्यालयात, झोन कार्यालयात आणि महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त टेंगले यांनी दिली आहे.
महिला राज...
आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत 126 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन वॉर्डांचे एक प्रभाग करण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण 42 प्रभाग असतील. एका प्रभागातून तीन सदस्य निवडले जातील. एकूण 126 वॉर्डांपैकी 26 वॉर्ड एससी, एसटीसाठी राखीव असतील. ज्यामध्ये 24 वॉर्ड एससीसाठी आणि 2 वॉर्ड एसटीसाठी राखीव असतील. एकूण 26 राखीव वॉर्डांमध्ये 12 वॉर्ड एससी महिलांसाठी आणि 2 वॉर्ड एसटी महिलांसाठी राखीव असतील. उर्वरित 100 वॉर्डांपैकी 50 वॉर्ड महिलांसाठी राखीव असतील. अशा प्रकारे आगामी महापालिकेत 126 वॉर्डांमधून 63 महिला निवडून येणार आहेत. उर्वरित 50 वॉर्डांमधून सुद्धा महिला निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे खुल्या 50 वॉर्डांमधून 5 ते 8 महिलांनी निवडणूक जिंकल्यास एकूण 126 वॉर्डांमधून 70 महिला आगामी महापालिका निवडणुकीत विजयी होऊन महापालिकेत जाऊ शकतात. ज्यावरून आगामी महापालिका निवडणुकीनंतर औरंगाबाद महापालिकेत महिला राज पाहायला मिळू शकतो.