Aurangabad Crime News: औरंगाबाद ग्रामीणच्या पैठण पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन जिल्ह्यांच्या वेशीवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील सीमेवर हा जुगाराचा अड्डा सुरु होता. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 16 आरोपींसह 36 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर काही आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सोनेवाडी गावात मोठा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पैठण पोलिसांनी दुपारी 3 वाजता जायकवाडी धरणाच्या बॅकवाटर भागात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. यावेळी पोलीसांनी 16 आरोपींना ताब्यात घेतले असून, 10 जण फरार झाले आहेत. तर घटनास्थळावरून पोलिसांनी 2 स्कॉर्पियो, 1 स्विफ्ट, 17 मोटरसायकल ताब्यात घेतले आहेत.
जम्बो कारवाई...
गेल्या वर्षभरात औरंगाबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईत ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. दोन जिल्ह्यातील पोलिसांना गुंगारा देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील काही जुगार किंग गेल्या काही दिवसांपासून जायकवाडी धरणाच्या भागात जुगार अड्डा भरवत होते. मात्र पोलिसांच्या कारवाईची भनक लागताच या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात निघून जात होते. मात्र पैठण पोलिसांनी कारवाईबाबत गोपनीयता पाळली, त्यामुळे जुगार भरवणारे सहज पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
शेवगावचा मटका किंग असा अडकला...
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील देवा नावाचा मटका किंग गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर जुगार अड्डा चालवायचा. मात्र कधीही तो पोलिसांच्या हाताला लागत नव्हता. पैठण पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुद्धा हा मटका किंग असल्याचे समोर आले आहे. त्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील मटका किंग आणि अवैधपणे जुगार अड्डा चालवणाऱ्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.