Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) पैठण तालुक्यातील होनोबाचीवाडी येथे धक्कादायक घटना समोर आली असून, मारहाणीचा अपमान सहन न झाल्यामुळे एका 20 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 5 फेब्रुवारीला घडली असून, याप्रकरणी सोमवारी (13 फेब्रुवारी) सायंकाळी चार जणांविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव विजयदास वैष्णव असे मृताचे नाव आहे. तर उदल किसन महेर, किसन काळू महेर, वंदना पुनम महेर आणि पुनम किसन महेर असे आरोपींचे नावं आहे.
या प्रकरणी गोपाल विजयदास वैष्णव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आणि त्यांचा भाऊ गौरव हे दोघेही घरी होते. यावेळी गावातील आरोपी पूनम किसन महेर, उद्यल किसन महेर, किसन काळू महेर, वंदना पूनम महेर यांनी शेतातील बांध कोरला म्हणून वाद घातला. यावेळी दोन्ही गटांत हाणामारी झाली. त्यात मारहाण झाल्याचा अपमान सहन न झाल्याने गौरव वैष्णवने 5 फेब्रुवारीला घरासमोर गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती कळताच सपोनि संतोष माने, पोउनि, सुरेश माळी, बिट अंमलदार रवी आंबेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता. याप्रकरणी गोपाल महेर यांच्या फिर्यादीवरून चारही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांना झाली होती मारहाण...
दरम्यान याप्रकरणी आत्महत्या करणाऱ्या तरुणाची आई अर्चना विजय वैष्णव (वय 36 वर्ष) यांनी 6 फेब्रुवारीला पाचोड पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 5 फेब्रुवारीला सकाळी दहाच्या सुमरास त्या गौरव यांच्यासह शेतात गेल्या होत्या. यावेळी त्यांना शेतामध्ये बांध कोरलेला दिसला. त्यामुळे त्यांनी शेता शेजारी असलेल्या पुनम किसन महेर यांना याबाबत विचारले असता, हा बांध आमचा आहे. येथे तुमच काही नाही असे म्हणून अर्चना वैष्णव यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच बांबूच्या काठीने मारहाण करायला सुरवात केली.
अन् दिला जीव...
दरम्यान हे भांडण सुरु असतानाच याचवेळी तिथे उदल महेर, किसन महेर आणि वंदना महेर देखील तिथे आले. तर गौरव व गोपाल हे भांडण सोडविण्यास आले. पण महेर कुटुंबातील सदस्यांनी अर्चना यांच्या दोन्ही मुलांना डोक्याला, पाठीला व मांडिला बांबुच्या काठीने मारले. ज्यात ते बेशुध्द झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर याच मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने गौरव विजयदास वैष्णव याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: