Aurangabad Crime News: एखाद्या चित्रपटात शोभेल असा बनाव करून एका पोलीस कर्मचाऱ्याने किराणा दुकानदाराच्या दुकानात गांजा ठेवून त्याला गुन्ह्यात अडकवल्याची घटना औरंगाबादच्या फुलंब्रीमध्ये समोर आली आहे. एवढेच नाही तर त्यावर पोलिस कारवाई सुद्धा झाली, मात्र दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे कारस्थान रचणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं भांडाफोड झाला आहे. त्यानंतर आता याप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या तीन साथीदारांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन शेषराव राठोड असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबादच्या फुलंब्री येथील दादासाहेब मोरे यांच्या किराणा दुकानात चार किलो गांजा सापडल्याची कारवाई 27 मे रोजी फुलंब्री पोलिसांनी केली होती. या प्रकरणात मोरे यांना अटक केल्यानंतर पोलीस कोठडी मिळाली. या कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीही मिळाली. त्यानंतर जामीन मिळाला. बाहेर आल्यानंतर किराणा दुकानदाराने सीसीटीव्ही फुटेज काढून तपासणी केली. तेव्हा 26 मे रोजी अज्ञात व्यक्तीने त्यांना फसवण्यासाठी त्यांच्या दुकानात गुपचूप गांजा असलेली बॅग ठेवून जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसले. त्यामुळे आपल्याला कोणी तरी फसविण्यासाठी गांजा ठेवल्याची तक्रार मोरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली. 


आरोपींकडून गुन्ह्याची कबुली... 


सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी तपासाचे आदेश दिले. तपासात अर्जुन शेषराव राठोड (रा. हिरापूर, ता. फुलंब्री) या पोलीस कर्मचाऱ्याने मोरे यांच्यासोबतच्या वैयक्तिक वादामुळे सचिन डोंगरे, विशाल फाजगे, राहुल दहिहंडे (सर्व रा. शेंद्रा) या तिघांच्या मदतीने दुकानात गांजा ठेवण्याचा कट रचल्याचे स्पष्ट झाले. तीन आरोपीकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांचा फरार सहकारी राहुल दहिहंडे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथून ताब्यात घेतल्याची माहिती कलवानिया यांनी दिली. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता,अर्जुन, सचिन, विशाल यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.