Vidhan Parishad Election : भाजपकडून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे. त्यामुळं त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी भाजप कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यां बरोबरच राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) नेतेही नाराज झाल्याचं समोर आलं आहे
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी डावलल्यानं राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) नेतेही नाराज झाल्याचं समोर आलं आहे. परभणीतील गंगाखेड पंचायत समितीच्या रासपच्या सभापती छाया मुंडे यांनी तर थेट भाजपला गंगाखेड तालुक्यातून हद्दपार करण्याची पोस्ट सोशल माध्यमांवर शेअर केली आहे. ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. परभणीच्या गंगाखेड तालुक्यात भाजप आणि विशेषतः पंकजा मुंडे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्याकडून आता भाजप बाबतची नाराजी उघड होऊ लागली आहे. चर्चा असताना सलग दुसऱ्यांदा भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी पंकजा मुंडे यांना देण्यात आली नाही. हीच बाब त्यांच्या समर्थकांना पटली नाही. त्यामुळं काही ठिकाणी भाजप विरोधात आंदोलन केली जात आहेत. तर कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप विरोधात पोस्ट शेअर करत आहेत.
कमळ चिन्ह हद्दपार करण्याचं आवाहन
परभणीच्या गंगाखेडमधील पंचायत समितीच्या विद्यमान सभापती छाया मुंडे या रासपकडून निवडून आलेल्या आहेत. त्यांनी एक पोस्ट तयार केली आहे. ज्यामध्ये पंकजाताई यांना विधान परिषद उमेदवारी डावलल्याच्या निषेधार्थ गंगाखेड तालुक्यातून कमळ चिन्ह हद्दपार करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच समस्त समाज बांधव 'ताई नाही तर भाजप नाही' असा आशय त्या पोस्टमध्ये देण्यात आला आहे. ही पोस्ट त्यांचे पती मुंजाराम मुंडे यांनी त्यांच्या फेसबुकवर टाकली आहे. ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. तसेच भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष जगन्नाथ आंधळे यांनी आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची पोस्ट फेसबुक वर शेअर केली आहे. एकूणच पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलण्यात येत असल्यानं त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजगी पसरली आहे. हे समर्थक आता सोशल माध्यमांमध्ये उघडपणे भाजपला विरोध करताना दिसत आहेत.
औरंगाबादमध्ये भाजप कार्यालयाची तोडफोड
औरंगाबाद-उस्मानपुरा भागातील भाजप कार्यलयासमोर देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पंकजा मुंडे यांना तिकीट मिळालं नाही म्हणून भाजपच्या कार्यालयाची तोडफोड देखील करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. कार्यलयाबाहेर मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. हे कार्यकर्ते भाजपचे अथवा पंकजा मुंडे यांचे नाहीत. हा हल्ल्याचा प्रयत्न शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा असू शकतो असे वक्तव्य भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Vidhan Parishad Election : चंद्रकांत पाटील म्हणाले, सदाभाऊ खोत शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते
- राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब