Aurangabad Crime News: वेगवेगळ्या थापा मारून औरंगाबादमध्ये एकाच दिवशी विविध पाच घटनांमध्ये तब्बल एक कोटीचा गंडा घातल्याचं बुधवारी समोर आले आहे. कुणी लॉटरी लागल्याची थाप मारून, कुणी अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलवर विश्वास ठेवून, तर कुणी कमीत कमी कष्टामध्ये झटपट लाखो रुपये कमावण्याचा नादात लाखो लाखो रुपये गमावल्याच्या घटना घडल्या आहेत.
पहली घटना
सिडको पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात, आयुर्वेदिक औषध देण्याचे आमिष दाखवून डॉ. दिलीप गणेश जैस्वाल (रा. सातारा) व प्रीती राजेंद्र बडगुजर यांनी 4 लाख 55 हजार रुपयांना फसवल्याची तक्रार दाखल झाली. विमल सोनार (57, रा. एन-7) यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सोनार यांच्या मुलाने जैस्वाल यांच्याकडून काही औषधी मागवली होती. त्यासाठी जैस्वाल यांनी 50 हजार रुपयांचा बेअरर चेक घेतला.त्यांनतर तो फरार झाला. सोनार यांच्यासह त्यांची नणंद सुतार व राम पुणेकर यांच्याकडून जैस्वाल व बडगुजरने 4 लाख 55 हजार रुपये घेतले. परंतु औषध दिले नाही.
दुसरी घटना
क्रांती चौक पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात एका हॉटेल चालकाची त्यांच्याच हॉटेलवर असलेल्या व्यवस्थापकाने 2020 पासून हॉटेलमध्ये 13 लाख ८७ हजार 599 रुपयांचा घोळ केला असल्याच समोर आले आहे. अर्जुन चव्हाण असे हॉटेल चालकाचे नाव असून, गणेश जया शेट्टी असे आरोपीचे नाव आहे.
तिसरी घटना
पुंडलिकनगर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात, सेवानिवृत्त शिक्षक संजय जगन्नाथ जाधव यांची त्यांच्या मित्रांनिच २१ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक केली. कमी दरात वाळूज परिसरात सोसायटीतले दोन प्लॉट घेऊन देण्याचे आमिष दाखूवन नंदुलाल राजाराम खैरनार, गणेश नंदुलाल खैरनार व विजया बँकेचे व्यवस्थापक भूषणचंद्र आर्य यांनी फसवणूक केल्याच्या तक्रारीत म्हटले आहे.
चौथी घटना
पैठण एमआयडीसीत प्रशांत हरीश दीक्षित यांनी गुगलवरून मोबीक्विक ॲपचा हेल्पलाइन क्रमांक शोधून त्यावर कॉल केला. तेव्हा भामट्याने ‘एनीडेस्क’ ॲप इन्स्टॉल करायला सांगत त्यांच्या खात्यावरून 95 हजार 999 रुपये उडवले.
पाचवी घटना
बजाज कंपनीतून सेवानिवृत्त सुधाकर मारुती खंडागळे (58) यांना काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपवर ‘केबीसी - कोन बनेगा करोडपती’च्या नावाने मेसेज आला. त्यात 33 लाख व 51 लाख रुपयांचे लकी ड्रॉ लागल्याचा मेसेज होता. त्यावर त्यांनी विश्वास ठेवून त्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यांनतर सायबर भामट्यांच्या टोळीतील 17 जणांनी विविध कारणे सांगून त्यांच्याकडून 34 लाख 6 हजार 497 रुपये उकळले.