Aurangabad Crime News: औरंगाबादच्या वैजापूर येथील गल्लेबोरगावातील एका पित्याने आपल्या पोटच्या दोन मुलांना विहिरीत फेकून त्यांची हत्या केल्याची घटना 2018 मध्ये समोर आली होती. याप्रकरणी सुनावणी करतांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मुलांची हत्या करणाऱ्या या आरोपीला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संतोष कचरू वाळूंजे (वय 40 वर्षे, रा.गल्लेबोरगाव) असे आरोपीचे नाव आहे. 


याप्रकरणी अधिक माहिती अशी की, संतोष वाळुंजे हे आपल्या पत्नीसह मुलगा गणेश ( वय 4 ) कृष्णा (3)  यांच्यासोबत राहत होते. तसेच एका हॉटेलमध्ये स्वयंपाकाचे काम करुन कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत होते. मात्र पत्नी सुनीता हिच्यासोबत त्यांचे कोणत्या-कोणत्या कारणाने वाद व्हायचे. दरम्यान 26 डिसेंबर 2018  रोजी चहाच्या कारणावरून पती-पत्नीन भांडण झाले. त्यामुळे संतोष व त्यांची आई कुसुम हे दोघे गल्लेबोरगाव येथील घरातून निघून गेले. त्यानंतर सुनीता दोन्ही मुलांना घेऊन त्यांच्या पाठीमागे देवगाव फाटा येथे आल्या व दोन्ही मुलांना संतोष यांच्या जवळ सोडून निघून गेल्या. 


रागाच्या भरात मुलांना विहिरीत फेकून दिले...


पत्नी दोन्ही मुलांना सोडून निघून गेल्यानंतर संतोष मुलांना घेऊन एका नातेवाईकांकडे गेले. पहिल्या दिवशी तिथे मुक्काम केला. त्यांनतर दुसऱ्या दिवशी वैजापूर येथील सरला बेटवर मुक्काम केला. त्यांनतर सकाळ होताच पुन्हा पायी प्रवास सुरु केला. मात्र याच दरम्यान रस्त्याच्या कड्याला असलेल्या एका शेतात थांबले. पत्नीचा रोजचा वाद आणि तीन दिवसांपासून सुरु असलेला प्रवास यातून आलेल्या रागाच्या भरात संतोष यांनी आपल्यासोबत असलेल्या दोन्ही मुलांना शेतातील विहिरीत फेकून त्यांची हत्या केली. त्यांनतर पोलिसांनी अकस्मात मृतूची नोंद केली होती.


आणि गुन्ह्याची कबुली...


दोन मुलांचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने पोलिसांना पहिल्यापासूनच हत्या केल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी आधी मुलांची ओळख पटवली. त्यांनतर संतोष यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, आपणच रागाच्या भरात दोन्ही मुलांना वीहीरत फेकल्याची कबुली संतोष यांनी दिली. त्यांनतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सुनावणीच्या वेळी एकूण 16 साक्षीदार तपासण्यात आले. अंतिम निकाल देतांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. मोहिउद्दिन यांनी आरोपी संतोष वाळूंजेला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.