Aurangabad News: राज्यातच नव्हे देशात गाजत असलेल्या शिवसेनेतील आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बंडात रोज नवनवीन घटना समोर येत आहे. त्यातच आता बंडखोर आमदारांनी आपल्या कार्यालयात माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो काढायला सुरवात केली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या जागी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. याची सुरवात औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्यापासून झाली आहे.
राज्यात शिवसेना आणि शिंदे गटाचे वाद सुरु असतांना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आम्ही बोलणार नसल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी बोलून दाखवली आहे. मात्र दुसरीकडे आता बंडखोर आमदारांकडून आपल्या कार्यालयात लावण्यात आलेल्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हद्दपार केले जात आहेत. बंडखोरी करण्यापूर्वी आमदार शिरसाट यांच्या कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र आता यातील उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढण्यात आले आहे.
असा केला बदल...
शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदार शिरसाट यांनी आपल्या कार्यालयात लावण्यात आलेल्या फोटोमध्ये मोठा बदल केला आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढले असले तरीही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो मात्र कायम आहे. तर बाळासाहेब यांच्या फोटोच्या बाजूला आणखी एक फोटो लावण्यात आला असून, तो आनंद दिघे यांचा आहे. तसेच शिरसाट यांनी आपल्या कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सुद्धा फोटो लावला आहे.
शिरसाट म्हणतात...
माझ्या कार्यालयात मी जास्त फोटो लावत नाही. आदित्य ठाकरे यांचा फोटो सुद्धा माझ्या कार्यलयात नव्हता. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत असल्याने त्यांचा फोटो असणे आवश्यक आहे. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचा फोटो माझ्या कार्यालयात असून, तो आयुष्यभर कधीही हलणार नाही. दिघे साहेब यांना आम्ही मानतो त्यामुळे त्यांचा फोटो आहे. तसेच जे लोकं रोजच आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणतात त्यांचे फोटो कसे लावणार?, ज्या दिवशी ते आम्हाला चांगले म्हणतील त्या दिवशी त्यांचा सुद्धा फोटो लावू असे शिरसाट म्हणाले.