Aurangabad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असतांना रात्री दहा वाजेनंतर त्यांच्या कार्यक्रमात लाउडस्पीकरचा वापर करण्यात आल्याचा आरोप होत असून, त्याप्रकरणी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
औरंगाबाद शहरातील क्रांती चौक आणि वेदांतनगर या दोन पोलीसा ठाण्यात मुख्यमंत्री यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच आता पोलीस काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे यावरून शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी सुद्धा आक्षेप घेत, कारवाई करण्याची मागणी केली होती.
काय म्हंटले आहे तक्रारीत...
वेदांतनगर पोलीस ठाण्यात मनोज सर्जेराव वाहूळ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, 31 जुलैरोजी शहरातील कोकणवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या ठिकाणी एकनाथ शिंदे हे रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान कोकणवाडी येथे आले. एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी आयोजकांनी फटाक्याची आतिषबाजी करून लाऊडस्पीकर वाजवलं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
क्रांती चौक पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या दुसऱ्या एका तक्रारीत आनंद कस्तुरे यांनी म्हंटले आहे की, शहरातील क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील स्टेजवर रात्री सव्वा दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाऊडस्पीकर मधून भाषण करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यासाठी बेकायदेशीर जमाव सुद्धा उपस्थित होता. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांसाठी वेगळा कायदा आहे का?
यावर बोलतांना शिवसेना आमदार अंबादास दानवे म्हणाले की, रात्री बारा-साडेबारा वाजेपर्यंत डीजे वाजत होते. त्यामुळे पोलिसांनी याची दखल घेतली पाहिजे. मुख्यमंत्री यांना वेगळा आणि सामन्य जनतेला वेगळा कायदा असतो हे तरी पोलिसांनी कबूल करावे असेही दानवे म्हणाले. कायदा सर्वांना समान असतो असे आपण म्हणतो, पण कायदा सर्वांना समान नसतो असे तरी म्हणा असा टोला दानवे यांनी लगावला आहे.