Aurangabad Crime News: औरंगाबादमध्ये (Aurangabad) एका प्रवाशाला रस्त्याच्या कडेला लघुशंका करण्यासाठी कार थांबवणं चांगलंच महागात पडलं असून, चोरट्यांनी चाकूहल्ला (Knife Attack) करून कारमधील लोकांचे 21  हजार घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल नानासाहेब घायवट (रा. शिऊर, ता. वैजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादनुसार त्यांच्यासह वाल्मीक जाधव, रामनाथ जाधव व नितीन श्रीवास्तव असे चौघे जण स्वीप्ट कारने (MH20  DJ1603) कन्नडहून शिऊरकडे जात होते. दरम्यान घायवट यांनी कन्नडला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सेवा हॉटेलजवळ रात्री नऊ वाजेच्या सुमारास लघुशंका करण्यासाठी कार थांबविली. यावेळी अचानक एका अनोळखी व्यक्तीने चालक बाजूच्या काचेवर मोठा दगड मारून काच फोडली. पण कारमधील लोकांना तो मनोरुग्ण असल्याची शंका आली. त्यामुळे ते कारचा दरवाजा उघडून बाहेर पडले. दरवाजा उघडतातच अचानक चार जण तेथे आले आणि त्यांनी हल्ला केला. 


चाकूहल्ला करत लुटले पैसे...


कारचा दरवाजा उघडताच झालेल्या हल्ल्यनंतर मागच्या सीटवर बसलेले वाल्मीक जाधव चोरट्यांवर ओरडले. त्यामुळे त्यांच्यामधील एका चोरट्याने त्यांच्या मांडीवर चाकू हल्ला करून जखमी केले. तसेच चालक सीटवरील रामनाथ जाधव यांच्या हातावर पोटावर चाकू हल्ला करून जखमी केले. एवढ्यावरच न थांबता रामनाथ जाधव यांच्या खिशातील 11 हजार, अमोल घायवट यांच्या जवळीक 9 हजार आणि वाल्मिक जाधव यांच्या जवळचे 1 हजार रुपये काढून घेऊन चोरटे पसार झाले. अचानक झालेल्या चाकू हल्ल्याने कारमधील सर्वजण भयभीत झाले होते. नंतर त्यांच्यावर कन्नड ग्रामीण रुग्णालयात व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. 


तिघांना घेतलं ताब्यात... 


या घटनेनंतर खळबळ उडाली असून, याप्रकरणी कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेतील तीन आरोपींना धुळे स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले असून एक आरोपी मात्र फरार आहे. तर धुळे पोलिसांच्या ताब्यातील तीनही आरोपींना कन्नड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. 


मित्राची दिल्लगी करणं महागात पडलं; तू आमदार झाला का? म्हणताच केली बेदम मारहाण