Aurangabad News: अनेकदा आपण ओळखीच्या लोकांची आणि मित्रांची दिल्लगी करत असतो. मात्र औरंगाबादमध्ये (Aurangabad) अशीच दिल्लगी एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. एवढंच नाही तर ही दिल्लगी अक्षरशः जिवावर बेतली असती. कारण दिल्लगीत 'तू आमदार झाला का?' म्हणणाऱ्या एका तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना पळशी येथे घडली आहे. तर या प्रकरणी चार जणांविरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय भिक्कन राकडे (रा. पळशी) असे बेदम मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर साईनाथ कैलास बडक (रा. पळशी, ह. मु. बजाजनगर औरंगाबाद) व अनोळखी तिघे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.


याबाबत दत्तात्रय राकडे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील साईनाथ बड़क शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून जात होता. दरम्यान यावेळी दत्तात्रय राकडे यांनी त्याला आवाज दिला. त्यामुळे साईनाथ याने दुचाकी काही अंतरावर दूर थांबविली. तर, तू आमदार झाला का? असे म्हणत दत्तात्रय यांनी त्याची दिल्लगी केली. त्यानंतर ते दत्तात्रय पुढे निघून गेले.  


बेदम मारहाण केली...


सकाळी झालेल्या घटनेनंतर रात्री आठच्या सुमारास साईनाथ याने फोन करून दत्तात्रय यांना कान्होबा मंदिराजवळ बोलावले. तेथे गेल्यावर त्यांना साईनाथ व तीन अनोळखी तरुण थांबलेले दिसले. तर तिथे जाताच सकाळी तू आमदार झाला का अशी दिल्लगी केल्यावरून दोघांमध्ये वाद झाला. तसेच मला आंधळा का म्हणाला असे म्हणत साईनाथ याने दत्तात्रय यांना बेल्टने मारहाण केली. त्याच्या साथीदारांनी अंगावरील कपडे काढले व पुन्हा लाथाबुक्क्याने मारहाण केली. या मारहाणीत ते बेशुध्द पडले आणि जेव्हा शुध्द आली, तेव्हा ते औरंगाबाद येथील घाटी रुग्णलयात असल्याचे त्यांच्या लक्षात आले असे फिर्यादीत दत्तात्रय राकडेने यांनी म्हटले आहे. या फिर्यादीवरून चार जणांविरुध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


अन्यथा दिल्लगी जिवावर बेतली असती


दत्तात्रय राकडे व साईनाथ बडक हे एकाच गावातील आहे. साईनाथ औरंगाबाद येथे हॉटेलवर आहे. दरम्यान गावाकडे आल्याने त्यांनी एकमेकांची दिल्लगी केली. मात्र दिल्लगीच्या रोषातून साईनाथने मित्रांच्या मदतीने दत्तात्रय राकडे याला बेदम मारहाण केली. यात तो बेशुध्द पडला. त्याला वेळीच गावातील इतरांनी रुग्णालयात दाखल केले नसते तर दिल्लगी जिवावर बेतली असती अशी चर्चा आता गावात होत आहे.