Aurangabad Accident News: औरंगाबादच्या कन्नड चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावरील औट्रमघाटात एका ट्रकने कारला पाठमागून जोराची धडक दिल्याने समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला कार धडकली. त्यामुळे दोन्ही ट्रकच्यामध्ये कार दबली गेल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चिंचोली लिंबाजी (ता. कन्नड)  येथील माजी जिल्हा परिषद सदस्या यमुनाबाई रामचंद्र पवार (वय 68 वर्षे) यांचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले. तर जखमींत एका गर्भवती महिलेचा समावेश आहे.


सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील औट्रमघाटातील सरदार पॉइंटजवळ समोर एक ट्रक (डीजे जीजे 36 व्ही 7852) अचानक थांबला. त्याचवेळी कारच्या मागून येणाऱ्या दुसऱ्या भरधाव ट्रकने (टीएन 36 डब्ल्यू 3999) कारला जोराची धडक दिली. ज्यामुळे कार समोरच्या ट्रकमध्ये घुसली. पाठीमागील धडक मारणारा ट्रक व पुढील ट्रकमध्ये कार चेपली गेली. यात यमुनाबाई पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 


मालेगाव येथे प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराणाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. या कार्यक्रमासाठी कृष्णा संदीप गव्हाणे (वय 66 वर्षे) आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत शिवपुराण ऐकण्यासाठी मालेगाव येथे निघाले होते.  दरम्यान याचवेळी कृष्णा गव्हाणे यांची बहीण चिंचोली लिंबाजी येथील माजी जिल्हा परिषद सदस्या यमुनाबाई पवार यांनाही त्यांनी चिंचोली येथून सोबत घेतले होते. मात्र प्रवास करत असतानाच कन्नडच्या औट्रमघाटात झालेल्या अपघातात यमुनाबाई पवार यांचा मृत्यू झाला आहे. 


रेस्क्यू पथकाने क्रेनद्वारे फसलेली कार बाहेर काढली... 


कारचालक कृष्णा संदीप गव्हाणे, अश्विनी कृष्णा गव्हाणे व गौरी कृष्णा गव्हाणे हे या अपघतात गंभीर जखमी झाले. यात अश्विनी कृष्णा गव्हाणे या गर्भवती आहेत. तर अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव येथील महामार्ग पोलिस केंद्रावरील पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. तोपर्यंत ट्रकचालक फरार झाला होता. तर रेस्क्यू पथकाने क्रेनद्वारे फसलेली कार व ट्रक वेगवेगळे करून जखमींना बाहेर काढले. जखमींना चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


औट्रमघाट बनला मृत्यूचा सापळा


औट्रमघाट सद्या मृत्यूचा सापळा बनला आहे. कारण या ठिकाणी भुयारी मार्ग नसल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होते. विशेष म्हणजे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी हजारो कोटी रुपये खर्च होऊन देखील, भुयारी मार्ग न झाल्यामुळे वाहतूक कोंडी कायम आहे. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रस्ता रोको आंदोलन देखील केले होते. त्यामुळे अपघाताची मालिका रोखण्यासाठी भुयारी मार्ग करण्याची मागणी सतत होत आहे.