Aurangabad Crime News: दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणं औरंगाबादच्या एका हॉटेलच्या मालकांना चांगलंच महागात पडला आहे. तर याच हॉटेलवर बसून चपटी घेणाऱ्यांची न्यायालयाच्या आदेशाने झिंग उतरली आहे. कारण या दोन्ही हॉटेल मालकांना न्यायालयाने अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी प्रत्येकी 25 हजाराचा दंड ठोठावला आहे. सोबतच दारू पिणाऱ्या चौघांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.
परवानगी नसताना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल आणि ढाबा चालकांवर गेल्या काही दिवसांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. दरम्यान अशीच काही कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या फुलंब्री तालुक्यातील अधिकाऱ्यांनी केली आहे. सावंगी बायपास रोडवरील शिवकन्या श्रावणी हॉटेलवर पथकाने छापा टाकला. यावेळी हॉटेल चालक दत्ता सोनवणे, शुभम बळी यांनी अवैधरित्या कसलाही दारुचा परवाना नसतांना विनापरवाना चार ग्राहकांना दारु पिण्यास परवानगी देवून, साहित्य पुरवल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण सहा जणांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
एकूण 54 हजारांचा दंड
या कारवाई नंतर शुल्क विभागाने गुन्हयाचे मुळ दोषारोप पत्रासह व सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने मुख्य आरोपी हॉटेल चालक दत्ता सोनवणे, शुभम बळी या दोघांना प्रत्येकी 25 हजार रुपये आणि इतर मद्यसेवन करणाऱ्या चारही ग्राहकांना प्रत्येकी 1 हजार असे एकूण 54 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यामुळे परवानगी नसलेल्या हॉटेलवर दारू पिणे चारही ग्राहकांना चांगलंच महागात पडला आहे. तर हॉटेल मालकांना सुद्धा तब्बल पन्नास हजाराचा दणका बसला आहे.
कुणाला किती दंड....
- दत्ता अर्जुन सोनवणे,(वय 28 वर्षे,रा. नादरपुर, ता. कन्नड,जि.औरंगाबाद)
हॉटेल मालक: 25 हजाराचा दंड, तसेच दंड न भरल्यास तीन वर्ष साधा कारावासाची शिक्षा. - शुभम साहेबराव बळी, (वय 24 वर्षे, रा. नादरपुर, ता. कन्नड,जि.औरंगाबाद) हॉटेल मालक: 25 हजाराचा दंड, तसेच दंड न भरल्यास तीन वर्ष साधा कारावासाची शिक्षा.
- प्रविण एकनाथ बुरड, (वय 45 वर्षे,रा.सारा परिवर्तन, ए-23/8 सावंगी, ता. जि. औरंगाबाद ) ग्राहक: 1 हजाराचा दंड, तसेच दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा.
- बंडु काशिनाथ दौड, (वय 40 वर्षे,रा. कोलठाण, ता.जि.औरंगाबाद) ग्राहक: 1 हजाराचा दंड, तसेच दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा.
- भागिनाथ जगन्नाथ काकडे,(वय 32 वर्षे, रा. हर्सुल, ता.जि.औरंगाबाद) ग्राहक: 1 हजाराचा दंड, तसेच दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा.
- प्रविण साहेबराव वाघ, (वय 38 वर्षे,रा.सावंगी, ता.जि.औरंगाबाद.) ग्राहक: 1 हजाराचा दंड, तसेच दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारवाईचा धडाका
परवानगी नसताना हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी जागा देणाऱ्या हॉटेल चालक आणि हॉटेलमध्ये बसणाऱ्या ग्राहकांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. त्यामुळे हॉटेल चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यात शुल्क विभागाकडून तात्काळ न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जात असल्याने न्यायालयाकडून होणार दंड पाहता परवानगी नसताना हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी जागा देणाऱ्या हॉटेल चालकांनी धास्ती धरली आहे.
महत्वाच्या बातम्या...
NIA-ATS Raids: औरंगाबाद, नांदेड विभागातून पॉप्युलर फ्रंटच्या 9 जणांना अटक, न्यायालयात हजर करणार