Aurangabad News: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात नशेखोरांची संख्या वाढली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी कडक पाऊल उचलत कारवाईचा धडाका लावला आहे. दरम्यान पोलीस आयुक्तांनी एनडीपीएस पथकाची नियुक्ती केली होती. त्यामुळे शहराला नशेमुक्त करण्यासाठी या पथकाने अनेक कारवाया केल्या आहेत. तर आयुक्तांनी आता 'अवैध मद्य विक्री विरोधी पथका'ची स्थापना केली आहे. त्यामुळे आगामी काळात पार्सल घेऊन हॉटेल-धाब्यावर बसणाऱ्यांवर थेट कारवाई होण्याची शक्यता आहे. 


शहरात अवैध दारू विक्री वाढली आहे, दारूची साठवणूक आणि हॉटेल-धाब्यावर दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे प्रकार वाढले आहेत. याठिकाणी दारू पिऊन अनेकजण गुन्हेगारी कृत्य करत असल्याचे सुद्धा काही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आता शहरातील नशेखोरीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी 'अवैध मद्य विक्री विरोधी पथका'ची स्थापना केली आहे. 


एनडीपीएस पथकाची दमदार कारवाई...


औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून नशेच्या बटण गोळ्याची विक्री मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. गल्लीबोळात सुद्धा सहज या गोळ्या उपलब्ध होत आहे. त्यामुळे भर रस्त्यावर टोळक्यांचा धिंगाणा, लुटमारसारख्या घटना वाढल्या होत्या. तर काही ठिकाणी खुनाच्या घटना सुद्धा समोर आल्या होत्या. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी एनडीपीएस पथकाची स्थापना केली. या पथकाने जोरदार कामगीरी करत अनेक कारवाया केल्या आहेत. तर गुजरातमधून शहरात येणाऱ्या नशेच्या गोळ्याचा कनेक्शन सुद्धा उघड केले आहे. त्यात आता अवैध दारू विरोधात सुद्धा पथक स्थापन करण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. 


असा असणार पथक...


'अवैध मद्य विक्री विरोधी पथका'च्या प्रमुखपदी सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड, तर अंमलदार मनोज चव्हाण, सुनील जाधव, नितेश सुंदर्डे, अभिजित गायकवाड, परशुराम सोनवणे, आरती कुसाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना तत्काळ त्यांच्या पदावरून कार्यमुक्त करून पथकाचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे पथकाकडून कारवाईला सुरवात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.