Aurangabad Crime News: औरंगाबाद शहर नशेखोरांचा अड्डा बनला असल्याचे चित्र असतानाच याच नशेखोरांचा आता पुन्हा एक कारनामा पाहायला मिळाला आहे. दारूच्या नशेत बेधुंद असलेल्या टोळक्याने हातात रिव्हॉल्व्हर घेऊन भर रस्त्यावर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोनवरून याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ धाव घेत या नशेखोरांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जालना रोडवरील रामगिरी हॉटेल भागात काही लोकांमध्ये वाद सुरु असून, त्यांच्या हातात रिव्हॉल्व्हर असल्याची माहिती काही नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यामुळे कंट्रोल रूममधून स्थानिक पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यांनतर काही वेळेतच सिडको आणि मुकंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी राडा घालणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले. तर याचवेळी निलेश दिहाडे याच्याजवळ एक रिव्हॉल्व्हर आढळून आली.
रिव्हॉल्व्हरचा परवाना नाही...
पोलिसांनी सर्वाना ताब्यात घेऊन सिडको पोलीस ठाण्यात नेले. त्यांनतर निलेश यांच्याकडे सापडलेल्या रिव्हॉल्व्हरच्या परवान्याबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. विशेष म्हणजे तैवान बनावटची असलेली ही रिव्हॉल्व्हर निलेश याने शहरातूनच विकत घेतली असल्याची माहिती त्याने पोलीस तपासात दिली आहे. सोबतच एअरगन चालवण्याचे 15 दिवसांचे त्याने प्रशिक्षण घेतल्याचे सुद्धा समोर आले आहे. त्यामुळे या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर नलेशने कुणाकडून रिव्हॉल्व्हर विकत घेतली याचा तपास सुद्धा पोलीस करत आहे.
गोळीबार झाल्याची चर्चा...
जालना रोडवरील रामगिरी हॉटेलसमोर झालेल्या राड्यावेळी गोळीबार झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. मात्र अशी कोणतेही घटना घडली नसून, गोळीबार झाल्याच्या प्रकार घडला नसल्याच पोलिसांनी सांगितले आहे. मात्र नशेखोर टोळीत वाद झाला असल्याच पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तर या राड्यात एक जण गंभीर जखमी झाला असल्याचे सुद्धा समोर आले आहे.