Aurangabad Rain News: पुढील चार ते पाच दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर याच पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांनाही पिकांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारतीय हवामान विभाग यांच्याकडील 9 डिसेंबर रोजीच्या हवामान विषयक पुर्वसुचना नुसार नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मॅन-डीस चक्रीवादळ गेल्या सहा तासांमध्ये 10 किमी प्रतितास वेगोने वायव्य दिशेला केंद्रस्थानी आहे. तर 9 डिसेंबर पासुन दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावरील पंडुचेरीच्या किनाऱ्यापासुन जवळजवळ वायव्येकडे सरकुन 75 ते 85 किमी प्रतितास वेगोने उत्तर तामिळनाडू ओलांडण्याची दाट शक्यता आहे.


सतर्कतेचा इशारा


या हवामानाच्या परिस्थितीमुळे 10 डिसेंबर पासुन पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हयासह इतर जिल्हयांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुषंगाने औरंगाबाद जिल्हयातील सर्व प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 


प्रशासनाच्या सूचना...


तर अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी पिके मळणी आणि  कापणीसाठी तयार असतील तर पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. फळे, भाजीपाला, शेती पिकांची सुरक्षित ठेवण करावी. जनावरे देखील सुरक्षित ठिकाणी बांधावेत. अतिवृष्टीमुळे सकल भागात काही प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे. गडगडाटी वाऱ्यासह पाऊस पडत असतांना नागरिकांनी मोकळया भागात थांबू नये. विजेचे खांब, झाडे इत्यादी ठिकाणी उभे राहू नये. विद्युत उपकरणांपासुन दुर रहावे, शक्यतो मच्छिमारांनी मासेमारीसाठी तलाव अथवा नदीत जाऊ नये. शेतकरी बांधवानी विजेचा गडगडाट होत असल्यास शेतीकाम करणे टाळुन सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा,असा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. 


जिल्हयातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी व नागरिकांनी सतर्क रहावे. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जवळच्या तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाच्या 0240-2331077 व 7350335104 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे. 


शेतकऱ्यांची चिंता वाढली... 


आधीच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप गेला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई किमान रब्बीतून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र आता पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धरपड सुरु आहे. 


Cyclone Mandos : चेन्नईच्या किनारपट्टीवर मंदोस चक्रीवादळची धडक, 'या' तीन राज्यात 'रेड अलर्ट', महाराष्ट्रातही परिणाम