Aurangabad Crime News: औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात चार दिवसांपूर्वी बॉम्ब सापडल्याने मोठी खळबळ उडली होती. मात्र अखेर पोलिसांनी बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्तीला शोधून काढले आहे. मित्राकडे असलेले उधारीचे पैसे अनेकदा मागून सुद्धा परत करत नसल्याने त्याला धडा शिकवण्यासाठी एका ईलेक्ट्रीकलची दुकान चालवणाऱ्या व्यक्तीने हा बॉम्ब ठेवला असल्याचे समोर आले आहे. रामेश्वर ज्ञानेश्वर मोकासे (वय 26वर्षे,  म्हाडा कॉलनी, कन्नड जी.औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जून रोजी कन्नड शहरातील मुख्य मार्गावरील एका फर्निचरच्या दुकानासमोर मोबाईलच्या रिकाम्या बॉक्स मध्ये कमी तिव्रतेचा बॉम्ब मिळून आला होता. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकांने अत्यंत सुरक्षितपणे त्याला हाताळुन निर्जनस्थळी नेऊन नष्ट केला होता. यावरून कन्नड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व कन्नड शहर व ग्रामीण पोलीसांचे 4 पथके तयार करून घटनेच्या अनुषंगाने तपासाबाबत सुचना दिल्या होत्या.


दरम्यान, कन्नड येथील हिवरखेडा रोडवर इलेक्ट्रीकल व रुद्रा रेफ्रीजरेशन नावाची दुकान चालवणारा रामेश्वर ज्ञानेश्वर मोकासे याने हा बॉम्ब ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन विचारपुस केली असता सुरुवातीला त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली. मात्र त्यांनतर पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 


यामुळे ठेवला बॉम्ब... 


पोलिसांनी रामेश्वर याची अधिक चौकशी केली असता त्याने आपणच बॉम्ब ठेवल्याच कबूल केलं. त्याचा मित्र दिनेश राजगुरू (रा. शांतीनगर, कन्नड ) याचकडे मागिल दोन वर्षांपासून उधारीची रक्कम बाकी होती. अनेकदा मागणी करून सुद्धा दिनेश उधारीचे पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. याबाबत त्याचा चुलत भाऊ किरण राजगुरू याला सुध्दा त्याला समजावून सांगण्याबाबत रामेश्वरने विनंती केली होती. परंतु काहीच फरक पडला नाही. त्यामुळे धडा शिकवण्यासाठी किरण राजगुरू यांच्या दुकानासमोर रामेश्वरने घातपात करण्यांचे उद्देशाने बॉम्ब ठेवला होता. यावरून रामेश्वर विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता 16 तारखेपर्यंत पोलीस कठोडी मिळाली आहे.