Aurangabad Vegetables Rate Increased: वाढत्या महागाईत आता भाज्यांच्या दराने सर्वसामान्यांना झटका दिला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर भाज्यांच्या दरात दोन ते तीन पटीने दरवाढ झाली आहे. औरंगाबादच्या सर्वच भाजी मंडित अशीच परिस्थिती आहे. बीन्स,शेवगा, दोडके आणि कारलेच्या दराने शंभरी पार केली आहे. त्यामुळे किचनमधील महिलांचा बजेट कोलमडला आहे. 


पावसाळ्याच्या तोंडावर भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक कमी झाल्याने भाजीपाला महागला आहे. औरंगाबादच्या गुलमंडी, शहागंज, उस्मानपुरा, मुकंदवाडी आणि जाधवमंडीत भाजीपाल्याचे दर वाढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजी मार्केटमध्ये ग्राहक कधी येतील याची वाट पाहण्याची वेळ भाजी विक्रेत्यांवर आली आहे. दररोजच्या जेवणात लागणाऱ्या कारले, दोडके, शेवगा आता शंभर रुपये किलो मिळत आहे. तर दुसरीकडे टोमॉटो 80 रुपये किलो मिळत आहे. एकट्या औरंगाबाद शहरात रोज 30 ते 40 टन टोमॉटो विक्री होते. मात्र त्याचीही आवक कमी झाल्याने दर वाढले आहे. 


काय आजचे दर...


औरंगाबाद शहरातील भाजी मार्केटमध्ये बीन्स 150 रुपये प्रतिकिलो, शेवगा 110 रुपये, दोडके 100 रुपये, कारले 100 रुपये, फुलकोबी 80 रुपये, सिमला मिरची 80 रुपये, गवार 80 रुपये प्रतिकिलो तर टोमॉटो 80 रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. 


यामुळे वाढला दर... 


उन्हाळा असल्याने त्याचे परिणाम भाज्यांवर सुद्धा होतो. ऊन जास्त पडल्याने शेतातील भाजीपाला खराब होतो. त्यामुळे उत्पन्न कमी झाल्याने भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक कमी होते. आवक कमी झाल्याने भाज्यांच्या दरात वाढ होते. त्यामुळे पावसाळा सुरु झाल्यानंतर या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. 


कांद्याच्या दरातील घसरण कायम... 


एकीकडे सर्वच भाजीपाला महागला असताना दुसरीकडे मात्र कांद्याच्या दरात मात्र वाढ होताना दिसत नाही. भाजी मार्केटमध्ये आजही चांगला कांदा 10 रुपये किलो मिळत आहे. शहरात दररोज 50 ते 80 टन  कांद्याची विक्री होत असते. उन्हाळी कांदा बाजारात येत असून आवक जास्त असल्याने भाव 10 रुपये किलोपर्यंत येऊन ठेपले आहेत.