Aurangabad Rain News: जिल्हाभरात पाऊस कोसळत असतांना सोयगाव तालुक्यात मृग नक्षत्र कोरडे जाण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र शनिवारी सोयगावच्या वेताळवाडीच्या जंगलात मृगाच्या जोरदार पावसाचे संकेत देणारा ठिपकेदार पिंगळा दुर्मिळ पक्षी आढळल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला आहे. तर  या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दुर्मिळ 'पिंगळा' आढळून आल्यानंतर चांगला पाऊस पडण्याचे संकेत असतात असे जुने जाणकार सांगतात. 


औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र असे असताना सोयगाव भागात मात्र अजूनही पाऊस पडला नसल्याने मृग नक्षत्र कोरडे जाण्याची भीती शेतकऱ्यांना होती. दरम्यान शनिवारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा निरीक्षणात पिंगळा पक्षी आढळला आला आहे. त्यामुळे वन विभागाने त्याचे छायाचित्र टिपून त्याच्या आकाशा कडे एक टक पाहण्याच्या हालचालीही टिपल्या आहे. अशा प्रकारच्या ठिपकेदार पिंगळा पक्ष्याचे दर्शन झाल्यास मृगाची जोरदार हजेरी लावण्याचे संकेत असल्याचे बोलले जाते. 


असा आहे दावा... 


जुन्या जाणकारांच्या मते हा दुर्मिळ पक्षी पावसाळ्यातच आढळतो. विशेष म्हणजे ज्या भागात जोरदार  पाऊस होणार आहे, त्याच भागात हा पक्षी येतात. त्यामुळे कोणत्या वर्षी जोरदार पाऊस येणार याचे संकेत दुर्मिळ ठिपकेदार पिंगळा पक्षी देत असतो असा दावा शेतकरी करतात. तर यावरून पेरणीबाबत निर्णय घेण्यात येतो असेही शेतकरी म्हणाले. 


कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन...


औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील खरीप पूर्व आढावा बैठक कृषी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. औरंगाबादेतील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी राज्याच्या तुलनेत मराठवाड्यात सोयाबीन आणि कापूस उत्पदान क्षमता खूप कमी आहे. त्यामुळे या पिकाची उत्पादकता वाढावी यासाठी राज्यसरकारने हजार कोटींचा निधी उपलब्ध केला असल्याची माहिती, धीरज कुमार यांनी दिली. सोबतच जोपर्यंत 75 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नयेत असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.