Aurangabad Crime News: औरंगाबादच्या वाळूज भागातील धामोरी शिवारात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खर्चासाठी पेन्शनचे पैसे देत नसल्याने पुतण्यानेच वय वृध्द चुलत्यालाच्या डोक्यात सिमेंटची चूल घालून हत्या केली आहे. विनायक जनू साळवे (वय 70 वर्षे, रा. धामोरी शेतवस्ती, ता. गंगापूर) असे मयताचे नाव असून, श्याम एकनाथ साळवे (वय 29 वर्षे, रा. धामोरी शेतवस्ती, ता. गंगापूर) असे हत्या करणाऱ्या पुतण्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विनायक साळवे, भवजाई मीनाबाई साळवे, पुतण्या श्याम एकनाथ साळवे हे आपल्या कुटुंबासह धामोरी येथील गट नंबर 84 मधील शेतवस्तीवर राहत होते. मात्र श्याम हा काहीच काम धंदा करत नसल्याने विनायक यांच्यासोबत त्याचा नेहमी वाद व्हायचा. दरम्यान शनिवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा याच मुद्यावरून विनायक साळवे आणि श्याम यांच्यात वाद सुरु झाला. वाद एवढ्या विकोपाला गेला की, विनायक साळवे यांनी श्यामच्या आईला मारहाण केली.
डोक्यात घातली सिमेंटची चूल...
विनायक यांच्याकडून श्यामच्या आईला मारहाण होत असल्याने, श्याम दोघांचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेला. मात्र याचवेळी विनायक यांनी श्यामलाही चापट मारत त्याचा गळा धरला. त्यामुळे श्यामला राग अनावर झाला आणि त्याने शेजारी असलेली सिमेंटची चूल उचलून चुलत्याचा डोक्यात घातली. ज्यात विनायक यांचा जागीच मृत्यू झाला.
श्वानपथकामुळे श्यामची पोलखोल झाली...
विनायक यांचा मृत्यू झाल्याने गावात माहिती देण्यासाठी निघालेल्या आईलाही श्यामने मारहाण केली. तसेच घडलेल्या घटनेबाबत कुठेच वाच्यता न करण्याचे बजावले. त्यांनतर खुनाची घटनेची माहिती मिळताच पोलीसा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी श्यामकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकाला बोलावून घेतले. घटनास्थळी आलेल्या श्वानने शेताला चक्कर मारत श्यामकडे पाहून भुंकायला सुरवात केली. त्यामुळे पोलिसांनी श्यामला ताब्यात घेऊन, खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार वाळूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! राज्यात लवकरच साडेसात हजार पोलिसांची भरती; मुख्यमंत्र्यांची घोषणा
Aurangabad: मिनी बँकेतील साडेचार लाख रुपये चोरटय़ांनी लांबवले; पुरावा मिटवण्यासाठी चक्क...