Aurangabad News: राज्यात नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सत्तास्थापन होताच अनेक निर्णयांचा धडका लावला आहे. त्यातच औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. पुढील काही महिन्यात राज्यात तब्बल साडेसात हजार पोलिसांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. औरंगाबाद दौऱ्यातील एका कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या भाषणातून त्यांनी ही घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. दरम्यान शनिवार आणि रविवार असा दोन दिवसीय त्यांचा औरंगाबाद दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी मराठवाडा आणि राज्यातील अनेक विकास कामांच्याबाबतीत घोषणा केल्या. त्यातच राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून त्यानीं याविषयी सुद्धा एक महत्वाची घोषणा केली आहे.
पुढील काही महिन्यात राज्यात साडेसात हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याच मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहे. शहरातील टीव्ही सेंटर भागातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री यांनी अभिवादन केले. यावेळी तिथे पोलीस भरतीची तयारी करणारे अनेक मुलं जमली होती. मुख्यमंत्री येताच तरुणांनी पोलीस भरती अशा घोषणाबाजी करायला सुरवात केली. तरुणांच्या घोषणा आयकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील काही महिन्यात राज्यात साडेसात हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे तरुणांनी सुद्धा टाळ्या वाजून त्यांच्या घोषणेचं स्वागत केले.