Aurangabad Crime: औरंगाबादच्या जिन्सी पोलीस ठाण्याचे प्रमुख व्यंकटेश केंद्रे यांच्यावर पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे केंद्र यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी शेख मुजाहिद याने पुन्हा एकदा एका सहायक उपनिरीक्षकावर हल्ला केला आहे. ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना मुजाहिदने सहायक उपनिरीक्षक नजीर खान सुबान खान यांच्यावर हल्ला केला.
नेमकं काय घडलं...
केंद्रे हे जिन्सी पोलीस स्टेशनचे ठाणेप्रमुख आहे. मंगळवारी पोलीस ठाण्यात त्यांना एक सामजिक संघटनेच शिष्टमंडळ भेटायला आले होते. शिष्टमंडळाकडून केंद्र सत्कार स्वीकारतच असताना शेख मुजाहिद नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने केंद्र यांच्यावर अचानकपणे चाकू हल्ला केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलीस ठाण्यात गोंधळ उडाला होता. त्यांनतर केंद्र यांना तात्काळ शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनतर आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली.
पुढील 48 तास महत्वाचे...
केंद्र यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहे. अतिरक्तस्त्राव झाल्याने रात्रीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांनतर त्यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आहे. खुद्द पोलीस आयुक्त निखील गुप्ता हे केंद्र यांच्यावर सुरु असलेल्या उपचाराचा आढावा घेत आहे. मात्र आरोपीने केलेल्या चाकू हल्ल्यात एक वार पोटात आणि दुसरा पोट आणि छातीच्या मध्यभागी लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला आहे. त्यामुळे पुढील 48 तास महत्वाचे असल्याच डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
आरोपीला पोलीस तीन दिवसांची कोठडी
आरोपी शेख मुजाहेद शेख उस्मान (वय 55, रा. कटकट गेट) याला बुधवारी न्यायालयात हजर केले. हल्ल्याचा उद्देश काय होता?, त्याला कोणाची साथ आहे का?, जुना वाद नेमका काय?, याचा तपास करण्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली. त्यावरून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची (दि. 25 जूनपर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे.