Maharashtra Political Crisis : कालपासून सुरु असलेल्या सर्व राजकीय घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पहिल्यांदाच भाष्य केले आहे. त्यांनतर अनेक प्रतिक्रिया येत आहे. तर शिवसेनेसोबत आमचे राजकीय मतभेद असू शकतात पण आज उद्धव ठाकरेंना ऐकल्यानंतर माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर अनेक पटींनी वाढला आहे. तुमच्या नम्रतेनं सर्व विरोधकांना जोरदार चपराक मिळालीय, असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे नेते तथा खासदार इम्तियाज यांनी दिली आहे. 


काय म्हणाले जलील... 


याबद्दल एबीपी माझाला प्रतिक्रिया देतांना जलील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या भाषणात प्रामाणिकपणा दिसत होता. माझ्या शिवसैनिकांनी येऊन मी मुख्यमंत्री पदासाठी नालायक असल्याच सांगितले असते तर मी राजीनामा दिला असता असे जे विधान ठाकरे यांनी केलं, त्यात प्रामाणिकपणा होता असे जलील म्हणाले. शिवसेनेसोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद आहेत ते राहणार पण, त्यांच्याबद्दल आज आदर वाढला असल्याच जलील म्हणाले. 


यासाठी हिम्मत लागते...


मला कोणताही अनुभव नसतांना माझ्यावर मुख्यमंत्री पदाची जवाबदारी देण्यात आली. त्यांनतर कोरोना आला पण त्यावेळी मी प्रामाणिकपणे काम केले, या बोलण्यात सुद्धा प्रामाणिकत दिसत होती. मी राजीनामा देण्यासाठी,खुर्ची सोडण्यासाठी तयार आहे असे आजच्या काळात बोलणे यालाही हिम्मत लागते, असेही जलील म्हणाले. 


काय म्हणाले उद्धव ठाकरे...


फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मला आज दु:ख झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले म्हणाले असते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको, तर समजून घेतलं असतं. हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं....सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर येऊन सांगावं.... तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको असं तोंडावर सांगावं. मी आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो... जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं. ही लाचारी नाही, मजबुरी नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत... तोपर्यंत मी कोणतेही आव्हान स्वीकारेन."