Aurangabad News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाविरुद्ध 2011 मध्ये शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले आहे. त्यावेळी घोषणाबाजी करत पुतळा जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान याप्रकरणी न्यायालयाने खैरे यांच्यासह दहा जणांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वाय. पी. पुजारी यांनी हे आदेश दिले आहे. 


काय होते प्रकरण...


2011 मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोषाचे वातावरण होते. दरम्यान औरंगाबादमध्ये 02 जून 2011 रोजी तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील टीव्ही सेंटर चौकात निदर्शने करण्यात आली होती. तर 'अजित दादा मुर्दाबाद, अजित दादा बँक लुटारू' अशा घोषणा देत, अजित पवारांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास चपलाचा हार घालून पुतळा जाळला होता. त्यामुळे याप्रकरणी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.      


यांच्यावर झाले होते गुन्हे दाखल...


पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यावर या प्रकरणात 13 ऑगस्ट 2014 रोजी चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, तत्कालीन महापौर अनिता घोडेले, मोहन मेघावाले, किशोर नागरे, हुशारसिंग चौहान, अनिल जैस्वाल, जगदीश सिद्ध व सविता सुरे यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.


न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता...


या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना सरकारी पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी साक्षीदारांच्या जबाबातील विसगती, तपासातील त्रुटी व गुन्ह्यास पूरक असे पुरावे सरकारी पक्ष न्यायालयात सादर करू शकले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने बुधवारी 6 जुलै रोजी गुन्ह्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.यावेळी बचाव पक्षातर्फे ऍड. सचिन शिंदे, ऍड. अभिजित पाखे, ऍड. आकाश मळवतकर, ऍड. दत्ता काळे यांनी काम पाहिले.