Marathwada Rain Update: गेल्या दोन आठवड्यापासून पाठ फिरवलेल्या वरुणराजाने अखेर मराठवाड्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे सद्यस्थितीला तरी मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. विभागातील औरंगाबाद, जालना, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यासह सर्वदूर पाऊस पाहायला मिळाला. तसेच आज आणि उद्या पुन्हा मराठवाड्यातील काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

गेल्या 24 तासात कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस झाला.

अ.क्र. जिल्ह्याचे नाव  किती पाऊस पडला 
1 औरंगाबाद  11.80 मिमी 
2 जालना  19.80 मिमी
3 हिंगोली  21.90 मिमी
4 नांदेड  15.40 मिमी
5 लातूर  10.90  मिमी
6 उस्मानाबाद  07.90 मिमी
7 बीड   09.40  मिमी

यंदा मराठवाड्यात सुरवातीपासूनच पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे सुरवातीला पेरण्या उरकलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत होते. मात्र बुधवारी मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात दमदार पाऊस पाहायला मिळाला. तर हिंगोली जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस पडला. तसेच नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी पाहायला मिळाली. 

Maharashtra Rain Updates : राज्यभरात पावसाची कोसळधार; कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?

आजही पावसाचा अंदाज...

बुधवारी मराठवाड्यात झालेल्या दमदार पावसानंतर आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 7 जुलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.