औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील पालफाटा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आलेल्या एका चारचाकी गाडीने पेट घेतला. पंपावरील कर्मचारी गाडीत पेट्रोल टाकणार तेच कारच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली. पट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी वेळीच खबरदारी घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली असून, सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फुलंब्री जवळील पालंफाटा येथे असलेल्या जय पेट्रोल पंपावर फोर्ड कंपनीची (एम.एच. 20 बी.एन.7329) कार घेऊन चालक इंधन भरण्यासाठी आला. यावेळी त्याने वाहन बूथ समोर उभी केली. इंधन भरण्यापूर्वीच अचानक गाडीच्या इंजिनमधून धूर निघायला सुरुवात झाली. काही क्षणात धूर आणखी वाढला. पाहता-पाहता काही वेळेतच गाडीने पेट घेतला. कारचालक आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या ही बाबा लक्षात आली. त्यांनी तत्काळ पंपावर असलेल्या अग्निरोधकाने आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनतर तात्काळ एमर्जन्सी बटन आणि ऑफीस बंद करून तीन फायर बोटलनी गाडी विजवण्यात आली. वेळीच प्रयत्न झाल्याने अनर्थ टळला. ही संपूर्ण घटना पंपावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
गाडीत व्यक्ती अडकला...
कारचालक गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी खाली उतरले. त्यांनतर ऑनलाइन पेमेंट करत असताना कारला अचानक आग लागली. यावळी कारमध्ये आणखी एक व्यक्ती समोरच्या सीटवर बसलेला होता. मात्र आग लागल्यावर कार बाहेरून लॉक झाली. त्यामुळे आतील व्यक्ती गाडीतच अडकला. पण ही बाब कारचालकच्या लक्षात येताच त्यांनी बाहेरून कारचा दरवाजा उघडून त्यांना बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
घटना सीसीटीव्हीत
पेट्रोल पंपावर घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ज्यात कार चालक पंपावर आला तेव्हा तिथे एका महिलेसोबत असलेला दुचाकीस्वार गाडीत पेट्रोल टाकत होता. तर याचवेळी कार चालक आणि पंपावरील दोन कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. गाडीतून धूर निघत असल्याचे पाहताच दुचाकीस्वार आणि सोबतच्या महिला बाजूला पळून गेले. तर याचवेळी पंपावरील कर्मचारी यांनी मोठी हिम्मत दाखवत आग विझवली. सोबतच पेट्रोल पंपाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एमर्जन्सी बटन इंधन पुरवठा सुद्धा बंद केला.