Aurangabad Crime News: औरंगाबाद शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नोटा छापून चलनात आणणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. तर याप्रकरणी पोलिसांनी एकूण सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर पुन्हा एकदा बनावट नोटांचा मुद्दा ऐरणीवर आला असून, चिंतेचा विषय बनला आहे. याप्रकरणी पुंडीलनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


औरंगाबाद शहरात बनावट नोटा छापून चलनात आणणारे रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहे. याप्रकरणी आरोपींकडून 25 हजार 700 रुपयांच्या बनावट नोटांसह 1 लाख 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने शहरातील शिवाजीनगर परिसरात सापळा रचून सहा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांचा एक साथीदार फरार आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक इसम मोपेड प्लेझर क्रमांक MH 20- FY - 9579 ने शिवाजीनगर परिसरातील पाण्याच्या टाकीसमोर बनावट चलनी नोटा खऱ्या म्हणुन वापरण्याकरीता घेवुन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळ्याचे नियोजन करून मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी पोहचुन सापळा लावून सहा जणांना ताब्यात घेतले आहे. सोबतच आंबादास ससाणे नावाच्या व्यक्तीच्या मार्फत बनावट चलनी नोटा चलनात आणण्याचे रॅकेट चालत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.


हे आहेत आरोपी... 


गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत करत हनुमंत अर्जुन नवपुते (वय 21 वर्ष रा. धारदोनगाव ता.जि. औरंगाबाद), २३०किरण रमेश कोळगे (वय 23 वर्ष रा. गाडीवाट ता. जि. औरंगाबाद), चरण गोकुळसिंग शिहरे (वय 40 वर्ष रा. घारदोन ता. जि. औरंगाबाद), प्रेम गोकुळ शिहरे (वय 26 वर्ष रा. सदर), संतोष विश्वनाथ शिरसाठ (वय 47 वर्ष रा. राजीवनगर, रेल्वेस्टेशन, औरंगाबाद), हारुणखान पठाण (रा. बायजीपुरा, औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले आहे. 


कारवाईतील मुद्देमाल...



  • 100 रुपये दराच्या 257  बनावट चलनी नोटा

  • एकूण पाच मोबाईल हॅन्डसेट

  • गुन्हयात वापरलेली मोपेड

  • नोटा विक्री मधून आलेले 21 हजार 500 रुपये

  • छपाई साठी लागणारे शाईच्या बॉटल

  • नोटा कटींग करण्याचे मशिन 


महत्वाच्या बातम्या...


तर ठरलं 'हे' मंत्री करणार मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने आठही जिल्ह्यात ध्वजारोहण


अजबच! कंत्राटदाराला मिळालेलं कंत्राट भुमरेंच्या जावयाला; थेट रजिस्ट्रीच करून घेतल्याचा दानवेंचा आरोप