Crime News :  न्यायालयात व्यवस्थित साक्ष न दिल्याच्या वादातून एकावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याची घटना घडली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील वाळूज (Waluj) औद्योगिक परिसरातील रांजणगाव शेणपूंजीतील कमळापूर भागात घडली. सागर सुभाष सदर (Sagar Subhash Sadar) (वय अंदाजे २५, रा. हनुमान नगर कमळापूर) असे गोळी लागून जखमी झालेल्याचे नाव आहे.


कमळापूर भागातील हनुमान नगर परिसरातील सागर या तरुणाला त्याच भागातील गजा मोरे याने त्याच्याकडील गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. या गोळीबारात सागर यांच्या उजव्या बरगडीत गोळी लागल्यानं तो गंभीर जखमी झाला आहे. सागरला उपचासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, गजा मोरे याच्या बहिणीने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. या प्रकरणात सागर हा साक्षीदार होता.


दरम्यान, सागरने चुकीची साक्ष दिली. त्यामुळेच आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटले. या कारणावरून गजा मोरे याने शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास सागरला कमळापूर फाट्यावर अडवले. यावेळी गजाचे चार ते पाच साथीदार आणि सागर यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने गजा मोरे याच्यासोबतच्या साथीदारांनी सागरवर तलवारीने वार केले. ते चूकवताना सागर हा जमीनीवर कोसळला. याचवेळी गजाने सागरवर गावठी कट्ट्यातून सुमारे चार ते पाच गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी सागरच्या उजव्या बरगडीत लागली आहे. यावेळी सागर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला नागरिकांनी उपचारासाठी तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान एवढी मोठी खळबळ उडवणारी घटना घडल्यानंतरही याबाबत एमआयडीसी वाळूज पोलिसांना साधी खबरही नव्हती.


 चोवीस तासातच हल्ल्याची दुसरी घटना...


गेल्या 24 तासापूर्वीच कुर्‍हाडीने हल्ला केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घटली होती. ही घटना जोगेश्वरी भागात घडली होती. या घटनेनंतर चोवीस तासातच शुक्रवारी रात्री कमळापूर भागात गोळीबाराची घटना घडली. यावरुन गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याची चर्चा नागरिकांतून व्यक्त करण्यात होत आहे.