Aurangabad Crime News: औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत शेतात गांज्याची शेती करणाऱ्या एकाला अटक केली आहे. बाहेरून केळीची बाग दिसणाऱ्या शेताच्या मधोमध चक्क गांज्याची लागवड करण्यात आली होती. याबाबत माहिती मिळताच फर्दापुर पोलिसांच्या पथकाने छापा मारत ही कारवाई केली आहे. त्यांनतर गांज्याची लागवड करणाऱ्या रामचंद्र दादा शिंदे यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फर्दापुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डी.बी. वाघमोडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली होती की, रवळा शिवारातील गट क्रमांक 09 मध्ये गांजा सारखी झाडे लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे मिळालेल्या माहीतीच्या आधारे वाघमोडे यांनी पोलीस पथकासह व राजपत्रीत अधिकारी, कृषी पदविकाधारक अधिकारी यांना सोबत घेऊन त्या शेताची पाहणी केली. यावेळी रामचंद्र दादा शिंदे यांच्या मालकीच्या शेतात असलेल्या केळीच्या बागेत मधोमध गांजासारखी दोन झाडे दिसुन आली.
एनडीपीएस कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल
केळीच्या बागेत आढळून आलेल्या दोन संशयित झाडांची पोलिसांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीने खात्री केली असता ती गांज्याचीच झाडं असल्याचं स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी रामचंद्र शिंदे यांच्या शेतातून 24 किलो 250 ग्रॅम वजनाचा एकुण किंमत 1 लाख 21 हजार रुपये किंमतीचा हिरवा पाला असलेला गांजा नावाचा अंमलीपदार्थ जप्त केला आहे. तर रामचंद्र शिंदे यांच्याविरुद्ध फर्दापुर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना धक्का बसला...
रामचंद्र शिंदे यांच्या शेतात गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र छापा टाकण्यासाठी गेल्याला पोलिसांना सर्वत्र केळीची बाग दिसत असल्याने सुरवातीला गांजा असण्याची शक्यता कमी वाटली. शेतात तपासणी करत असतांना सुद्धा सर्वत्र केळीचे झाडं पाहायला मिळत होते. पण बागेच्या मधोमध गांज्याची झाडे लावली गेली होती. त्यामुळे हे कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना सुद्धा धक्का बसला.
यांनी केली कारवाई..
औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक पवन बनसोड, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली फर्दापुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डी. बी. वाघमोडे, पोलीस नाईक निलेश लोखंडे, पोलीस अमलदार योगेश कोळी, प्रकाश कोळी, सतिष हिवाळे, पंकज व्यवहारे यांनी ही कारवाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या....
धक्कादायक! रस्त्याअभावी चिमुकल्याचा बळी, औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील घटना