Aurangabad Revenue Department Action: औरंगाबादचा महसूल विभागाने आज पहाटे अवैध वाळू (Illegal Sand) वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पाच हायवांसह एका जेसीबी (JCB) ताब्यात घेण्यात आला आहे. सुखनानदी पात्रात गौण खनिज विरोधी पथक आणि पैठण येथील महसूल अधिकाऱ्यांनी सयुक्तपणे ही कारवाई केली आहे. या कारवाईने वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 


गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) वाळू माफियांचा हैदोस पाहायला मिळत असून, अवैधरीत्या वाळू वाहतूक बिनधास्त सुरु असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे सुखनानदी पाञात रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या साह्याने हायवांमध्ये वाळू भरणा केली जात आहे. कोणतेही टेंडर (Tender)  नसतांना ही अवैध वाहतूक सुरु आहे. त्यामुळे अखेर पैठणच्या डायगव्हाण हद्दीतील सुखनानदी पात्रात गौण खनिज विरोधी पथक आणि पैठण उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांच्या पथकाने सयुक्तिक कारवाई केली आहे. ज्यात पाच हायवांसह जेसीबीवर कारवाई करण्यात आली आहे. 


पुढील कारवाई औरंगाबाद महसूल करणार!  


पैठणच्या डायगव्हाण हद्दीतील सुखनानदी पात्रात करण्यात आलेली कारवाई पैठण औरंगाबादच्या सीमेवर करण्यात आली आहे. सद्या पाच हायवा आणि जेसीबी ताब्यात घेण्यात आला आहे. सोबतच या सर्वांचे वाहनचालक यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. तर पंचनामा केल्यावर पुढील कारवाई औरंगाबाद तालुका महसूल अधिकारी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या कारवाईने वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 


वैजापूर-गंगापूर तालुक्यात कारवाईची मागणी


वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातून जाणाऱ्या गोदावरीला यावर्षी पूर आल्याने वाळूचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात वाळू माफियांनी गोदावरीला आपलं लक्ष केले आहे. सद्या कोणतेही शासकीय टेंडर नसतानाही या दोन्ही तालुक्यात अवैधरीत्या वाळू वाहतूक सुरु आहे. रात्रीच्या सुमारास याठिकाणी बिनधास्त वाळू वाहतूक सुरूच असते. त्यामुळे या ठिकाणी देखील कारवाईची मागणी होत आहे. सोबतच पैठण तालुक्यात देखील असेच काही चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबाद-पैठण रस्त्यावर रात्री 12 वाजेनंतर वाळू वाहतूक होत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे पैठणमध्ये देखील अशाचप्रकारे कारवाई करण्याची मागणी होत आहे. 


Fake Liquor: औरंगाबादमध्ये तब्बल 13 लाखांची बनावट दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई