Aurangabad Crime News: औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 1 मी रोजी झालेल्या जाहीर सभेत नांदेडचे मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदा यांची सोन्याची साखळी चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. बीड जिल्ह्यातील आरोपीला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. सोबतच त्याच्या साथीदाराला सुद्धा अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून साखळी सुद्धा जप्त करण्यात आली आहे. दत्ता श्रीमंत जाधव (वय 25 वर्ष, रा. गांधीनगर झोपडपट्टी ता.जि.बीड), उमेश सत्यभान टल्ले (वय 35 वर्ष रा.बीड) असे या दोन्ही चोरट्यांची नावे आहेत. 


औरंगाबाद इथे 1 मे रोजी आयोजित केलेल्या राज ठाकरेंच्या जाहीर सभेसाठी मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात मनसैनिक दाखल झाले होते. राज ठाकरेंच्या या सभेत विक्रमी गर्दी झाली होती. ज्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार हे देखील हजर होते. नांदेड जिल्ह्यातील गोल्डमॅन म्हणून मॉन्टीसिंह जहागीरदार यांची ओळख आहे. मॉन्टीसिंग जहागीरदार हे आपल्या अंगावर जवळपास 50 तोळे सोने नेहमी परिधान करतात. पण राज ठाकरे यांच्या सभेच्या दिवशी चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील सोन्यावर डोळा ठेवून आपला उद्देश साधला. त्यांची दहा लाख किंमतीची आणि 200 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी लंपास केली होती. त्यांनतर याप्रकरणी सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


पुण्यातून केली अटक...


मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी गुन्हा दाखल करताच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवली. यादरम्यान पोलिसांनी सभास्थळी लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी साखळी चोरणारे बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दत्ता जाधव याचा बीड जिल्ह्यात जाऊन शोध घेतला. मात्र तो बीडमध्ये मिळून आला नाही. याचवेळी जाधव हा पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी पुण्यातून जाधव याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने उमेश सत्यभान टल्ले याच्या मदतीने साखळी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेली साखळी जप्त केली आहे.