Aurangabad Municipal Corporation News: औरंगाबाद महानगरपालिका प्रभाग रचनेचा आराखडा फोडल्याप्रकरणी अखेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सिटी चौक पोलिसात हा गुन्हा दाखल झाला आहे. मनपाचा प्रारूप आराखडा सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. त्यांनतर शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी निवडणूक आयुक्त यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यांनतर सिटी चौक पोलिसात मनपाच्यावतीने विक्रम दगडू दराडे यांच्या तक्रारीवरून महानगरपालिकेत कंत्राटी संगणक चालक असलेल्या काझी हस्तीयाज सोहेल काझी याच्याविरोधात आराखडा फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने डिसेंबर 2021 मध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होता. पुढे तो निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला. आता त्या आराखड्यात सुधारणा करून अंतिम आराखडा तयार करण्याचे काम केले जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे सादर केला जाणारा प्रारुप आराखडा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांनतर यावरून राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. तसेच आराखडा सोशल मिडीयावर व्हायरल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली जात होती. 


असा फुटला आराखडा... 


मनपाच्यावतीने विक्रम दगडू दराडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 20 मे रोजी रात्री 10 वाजता आणि 28 मे दुपारी 4 वाजता कंत्राटी संगणक चालक काझी हस्तीयाज याच्या ताब्यात असलेले निवडणुकीचे गोपनिय दस्तऐवज प्रसार माध्यमे व सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. तसेच काझी याने निवडणुकीबाबत प्रभाग रचनेशी संबधीत कच्ची व प्राथमिक माहीती व्हायरल केली असे प्रथम दर्शनि दिसत, त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची फिर्याद दराडे यांनी दिली होती.  


राजकीय आरोप-प्रत्यारोप... 


महानगरपालिका प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा सोशल मीडियावर व्हायरल होताच राजकीय नेत्यांकडून आरोप -प्रत्यारोप सुरु आहे. आराखडा फोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी केली आहे. तर दुसरीकडे निवडणूक पुढे ढकलण्याचा हा डाव असून, चोराच्या उलट्या बोंबा अशी परिस्थिती शिवसेनेची झाली असल्याचा आरोप भाजप नेते राजू शिंदे यांनी केला आहे. 


मनपाचा खुलासा.. 


औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आराखड्याबाबत खुलासा करताना म्हटलं आहे की, प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सादर करण्यात आलेला आहे.मात्र मागील काही दिवसापासुन प्रसार माध्यमे, सोशल मिडीया यांचेव्दारे महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा फुटला अशा आशयाच्या बातम्या प्रसिध्द होत आहेत. या बाबत माहिती घेतली असता प्रभागांच्या सिमा आणि व्याप्ती यांचे वर्णन असलेली विना सही शिक्क्याची अनाधिकृत प्रत सोशल मिडीया वर फिरतांना दिसत आहे. परंतु महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम करण्याचे अधिकार सर्वस्वी राज्य निवडणूक आयोगास असल्याने सदर व्हायरल होत असलेल्या अनाधिकृत माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये,असं मनपाचे निवडणूक अयोग्य प्रमुख संतोष टेंगळे यांनी म्हटलं होते.