Mahavitaran Scheme: लोकांनी वीजबिल भरावे म्हणून महावितरणकडून प्रत्येकवेळी काहीना काही योजना राबवली जाते. आता मराठवाड्यातील वीज ग्राहकांसाठी अशीच काही भन्नाट योजना महावितरण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना ई-स्कूटर, मोबाइल, फ्रिज आदी बक्षिसे दिले जाणार आहे. 1 जून ते 30 ऑगस्टपर्यंत ही योजना सुरू राहणार असल्याची माहिती महावितरण विभागाने दिली आहे. 


कंपनीला पैसे देऊन महावितरण वीज विकत घेते. मात्र अनेक ग्राहक वीजबिल वेळेवर भरत नसल्याने वीज खरेदी करणे महावितरणाला अडचणीचे जाते. त्यामुळे वेळोवेळी वीजबिल वेळेवर भरण्याचे महावितरण ग्राहकांना सांगत असते. पण तरीही मोठ्याप्रमाणावर ग्राहक वीजबिल भरत नाही. ग्राहकांनी नियमित वीजबिल भरावे म्हणून महावितरणने मराठवाडा विभागात भन्नाट योजना आणली आहे. 


काय आहे योजना... 


या योजनेचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना बिल भरण्याच्या अंतिम मुदतीच्या आत सर्व बिले भरावी लागतील. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला महावितरणकडून सोडत होणार आहे. दर महिन्याला मराठवाड्यातील 101  उपविभागांतून 1 हजार रुपयांपर्यंतची प्रत्येकी 2 बक्षिसे वस्तू स्वरूपात दिली जाणार आहेत. त्यातील पहिले  बक्षीस हे तत्पर देयक भरणा करणाऱ्या ग्राहकास दिले जाणार आहे. तर दुसरे बक्षीस अंतिम मुदतीच्या आत बिल भरणाऱ्या ग्राहकासाठी असेल. महावितरणचे कर्मचारी वगळता मराठवाड्यातील सर्व घरगुती ग्राहकांसाठी ही योजना आहे. सोबतच दरमहा 22 विभागांतून प्रत्येकी एका मिक्सर ग्राइंडर किंवा त्या समकक्ष वस्तू, 9 मंडळांतून प्रत्येकी एक मोबाइल हँडसेट किंवा टॅब्लेट, 3 परिमंडळांतून प्रत्येकी एक एलईडी टीव्हीचे बक्षीस दिले जाणार आहे. तर प्रादेशिक कार्यालय स्तरावर ऑनलाइन बिल भरणाऱ्या ग्राहकांमधून प्रत्येक महिन्याला रेफ्रिजरेटरचे एक विशेष बक्षीस तर प्रादेशिक कार्यालयात स्तरावरच इलेक्ट्रिक स्कूटर या दरमहा बंपर बक्षिसाचाही समावेश आहे.